बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला. मात्र, अजूनही एक आरोपी फरार आहे. तर वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी धनंजय देशमुख यांनी केलीय. यानंतर आज धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केलं. यावेळी मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत घटनास्थळी उपस्थित होते.
'शोले स्टाईल' आंदोलन घेतले मागे : घटनास्थळी मनोज जरांगे पाटील आणि सीआयडी, पोलीस यंत्रणेचे अधिकारी या ठिकाणी तळ ठोकल्यानं प्रशासनाला घुंगरा देत धनंजय देशमुख यांनी थेट मोबाईल टाॅवर ऐवजी पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन केलं. यादरम्यान त्यांची तब्येत देखील खालवलेली पाहायला मिळाली. ठिकाणी नागरिकांसह पोलीस यंत्रणा, खासदार बजरंग सोनवणे, जरांगे पाटील देखील दाखल झाले होते. पोलीस प्रशासन आणि जरांगे पाटील यांच्या विनवणीनंतर अखेर धनंजय देशमुख यांनी आपलं 'शोले स्टाईल' आंदोलन मागं घेतलं आहे.
पोलीस अधीक्षक कॉवत, मनोज जरांगे घटनास्थळी दाखल : संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सुरुवातीला अर्धा ते पाऊण तासापासून गावात नसल्यानं गावकरी आणि महिला आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळं प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. टाकीवर चढून आंदोलन करताना धनंजय देशमुख यांची प्रकृती अस्वस्थ झाली. पाण्याच्या टाकीला जाणारी शिडी काढून टाकल्यानं पोलिसांना टाकीवर जाणं अवघड झालं आहे. गाव आणि कुटुंब भीतीच्या छायेत आहे. आरोपी आम्हाला मारण्याच्या आधी आम्ही जीव देतो, अशी धनंजय देशमुख यांनी भूमिका घेतली आहे. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे. एसआयटी, सीआयडी आणि सरकारचे प्रतिनिधी बोलून त्यांच्याशी चर्चा करू, असं पोलीस अधीक्षक कॉवत यांनी देशमुख यांना आश्वासन दिलं.
आरोपींना फाशी द्या : माझ्या भावाला ज्यांनी संपवल त्यांना फाशी द्या, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी ग्रामस्थ देखील आक्रमक झाले.
हेही वाचा -