चंद्रपूर PM Modi in Chandrapur : महायुतीच्या लोकसभेचा प्रचाराचा आज (8 एप्रिल) महत्त्वाचा टप्पा असणार आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी पहिली सभा चंद्रपूरमध्ये घेणार आहेत. भाजपानं चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून भाजपाचे हेवीवेट नेते सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय. तर महाराष्ट्रात प्रचाराचा श्रीगणेशा करण्यासाठी मोदींनी याच लोकसभा क्षेत्राची निवड का केली? तसंच भाजपासाठी चंद्रपूर मतदारसंघ का महत्वाचा आहे? याचा आपण आढावा घेऊया.
महाराष्ट्रात काँग्रेसची एकमेव जागा निवडून आली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वत्र मोदी लाट असताना चंद्रपुरात मात्र भाजपाला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा दारुण पराभव केला होता. भाजपासाठी हा निकाल धक्कादायक होता. हा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला. कारण संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसनं या एकमेव जागेवर विजय मिळवला होता. तेव्हापासून या लोकसभा क्षेत्रावर भाजपाचं लक्ष होतं. त्यानंतर ही जागा भाजपाला कशी मिळवता येईल यासाठी प्रयत्न सुरू झाले.
2019 नंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. जिल्ह्यातील सहा विधानसभापैंकी तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तर केवळ दोन ठिकाणी भाजपाला विजय मिळवता आला.
पदवीधर मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसचा विजय : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीच्या आजवरच्या इतिहासात भाजपाचं वर्चस्व होतं. मात्र, 2020 मध्ये काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी निवडून आले. त्यामुळं भाजपासाठी हा मोठा धक्का होता.