पुणे: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळताना पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या या निकालानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पुणे शहर कार्यालयाच्या बाहेर जल्लोष करण्यात आला. दिल्लीच्या या निकालाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली.
दिल्लीचा मराठी माणूस मोदींच्या मागे उभा : यावेळी दिल्ली निकालावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आजपर्यंत दिल्लीच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला. मात्र, विधानसभा निवडणुकीत आमची पीछेहाट झाल्याचं आम्ही बघितलं. मात्र एक मोठा विजय दिल्लीच्या जनतेने दिला आणि निश्चितपणे हे विकासाला दिलेलं मत आहे. भारतीय जनता पार्टी दिल्लीमध्ये लोकांच्या आशा, अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल. तसंच दिल्लीचा मराठी माणूस मोदी यांच्या मागे उभा राहिला याचा मला विश्वास आहे".
"दिल्लीत 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला गेला आहे. मी तमाम कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर दाखवला आणि या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे. सातत्याने खोटे आश्वासना देऊन लोकांना भटकावत त्यांनी ज्या प्रमाणे राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झाला. खोटं राजकारण चालणार नाही, हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलं". - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
काँग्रेसला एकही जागा नाही : दिल्लीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राहुल गांधी यांना लक्षात आलं होतं की, त्यांना दिल्लीत काहीही मिळणार नाही. त्यामुळं त्यांनी आधीच हरल्यानंतर काय बहाने सांगायचे याची तयारी करून ठेवली होती".
सोलापूरकर यांच्यावर कारवाई होणार : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बोलत असताना जनभावनेचा आदर करूनच आपण बोललं पाहिजे. या संदर्भात त्यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र जी काही कारवाई करायची आहे ती कारवाई केली जाणार आहे".
लाडक्या बहिणींवर काय म्हणाले फडणवीस? : लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कुठलाही नवीन निकष नाही. योजना जाहीर केली तेव्हा जे निकष होते आणि त्या निकषाव्यतिरिक्त वेगळा ज्यांनी अर्ज भरला आहे. त्यांच्यावर ही कारवाई होत आहे. मला आनंद आहे की काही आमच्या लाडक्या बहिणींनी स्वतःहून याचा लाभ सोडला आहे".
हेही वाचा -
- "जनादेश आम्हाला मान्य"; अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया, आतिशी म्हणाल्या भाजपाविरोधात युद्ध...
- 'आप'ची सत्ता गेल्यानंतर स्वाती मालीवाल यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या रावणालाही त्याचा अहंकार वाचवू शकला नव्हता
- तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीत भाजपा सत्तेवर येण्याची शक्यता, कल पाहून भाजप नेत्यांची तयारीसाठी पक्ष कार्यालयात बैठक