मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालंय. पक्षाच्या सर्व उमेदवारांना मिळून 0.06 टक्के मते मिळाली आहेत. पक्षाला मिळालेली ही मते 'नोटा' ला मिळालेल्या मतांपेक्षा कमी आहेत. नोटाला 0.57 टक्के मते मिळाली आहेत. पक्षासाठी ही नामुष्की मानली जात आहे. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्ता ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी या निवडणुकीमुळं पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्लीतील मतदारांपर्यंत पोचवण्यात यश मिळाल्याचा दावा केलाय.
पक्षाचं नाव आणि चिन्ह मतदारांपर्यंत पोचवण्यात यश : श्रीवास्तव म्हणाले, "यापूर्वी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पूर्ण ताकदीनं कधीच उतरला नव्हता. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आपले 30 उमेदवार जाहीर केले होते. त्यापैकी 7 जणांचं अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यामुळं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 23 उमेदवार रिंगणात होते. मात्र, या सर्व उमेदवारांनी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांना मते कमी मिळाली असली तरी, ते पक्षाचं नाव आणि चिन्ह प्रचाराच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचवण्यात यशस्वी झाले आहेत. याचा लाभ पक्षाला आगामी काळात होईल".
ओळख प्रस्थापित करण्याची संधी मिळाली : "दिल्लीच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपली ओळख प्रस्थापित करण्याची संधी मिळाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यापूर्वी जम्मू आणि काश्मिरमध्ये 31 जागांवर, झारखंड मध्ये 24 जागांवर निवडणूक लढवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यामध्ये याचा मोठा लाभ होईल", असा विश्वास श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.
भाजपाला दिल्लीत यश : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना महायुती सरकारमध्ये सहभागी आहे. मात्र, या पक्षाला देशाच्या राजधानीतील विधानसभा निवडणुकीत आपला प्रभाव पाडण्यात यश आलं नाही. आज जाहीर झालेल्या निकालात भाजपाला दिल्लीत 45.56 टक्के मते मिळाली आणि त्यांचे 48 आमदार विजयी झाले. तर, आम आदमी पक्षाला 43.57 टक्के मते मिळाली आणि त्यांचे 22 आमदार विजयी झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाविरोधात रिंगणात : भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. मात्र, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाविरोधात रिंगणात उतरला होता. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेसने देखील ही निवडणूक स्वबळावर लढवली होती. त्यामुळं इंडिया आघाडी आणि एनडीए अशा दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्ष स्बवळावर रिंगणात उतरले होते. मात्र, या निवडणुकीत भाजपानं बाजी मारली.
आप आणि कॉंग्रेस स्वबळावर लढल्याचा केजरीवालांना थेट फटका : आपचे संस्थापक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपाच्या प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी पराभव केला. प्रवेश हे भाजपाचे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे चिरंजीव आहेत. केजरीवाल यांना 25 हजार 999 तर विजयी प्रवेश यांना 30 हजार 88 मते मिळाली. केजरीवाल यांचा 4089 मतांनी पराभव झाला. तर, याच मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार संदीप दिक्षित यांना 4568 मते मिळाली आहेत. कॉंग्रेस आणि आप स्वबळावर लढल्यानं थेट अरविंद केजरीवाल यांना पराभव स्वीकारावा लागल्याचं यातून दिसून आलं.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना मिळालेली मते
मतदारसंघ | उमेदवार | मिळालेली मते | नोटा |
बुरारी | रतन त्यागी | 3852 | 2548 |
बदली | मुलायम सिंह | 92 | 692 |
चांदणी चौक | खालीदुर्र रहमान | 92 | 253 |
मातिया महल | मोहम्मद जावेद | 56 | 217 |
बल्ली मारन | मोहम्मद हारुन | 38 | 301 |
मोती नगर | सनाउल्ला | 60 | 689 |
जनकपुरी | मोहम्मद नवीन | 80 | 691 |
छतरपूर | नरेंदर | 173 | 868 |
संगम विहार | कमर अली | 78 | 537 |
बदरपूर | इम्रान सैफी | 322 | 915 |
लक्ष्मी नगर | नमहा | 48 | 686 |
शाहदरा | राजेंद्र पाल | 58 | 558 |
सीमा पुरी | राजेश लोहिया | 110 | 458 |
रोहतास नगर | अभिषेक | 91 | 630 |
घोंडा | मेहक डोग्रा | 46 | 588 |
गोकलपूर | जगदीश भगत | 64 | 601 |
करवाल नगर | संजय मिश्रा | 165 | 709 |
हेही वाचा -