सातारा : नमामि गंगेच्या धर्तीवर कृष्णा नदी शुध्दीकरणासाठी 'जय जय कृष्णे' हा प्रकल्प राबविण्यात यावा, अशी मागणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलीय. यासंदर्भातील निवेदन त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना दिलं.
प्रदूषणामुळं कृष्णेचं सौंदर्य, पावित्र्य धोक्यात : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'नमामि गंगा' ही संकल्पना मांडल्यानंतर केंद्र सरकारनं गंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासह पुनरूज्जीवनासाठी एकात्मिक अभियान हाती घेतलं होतं. त्याच धर्तीवर प्रदूषणामुळं सौंदर्य आणि पावित्र्य धोक्यात आलेल्या कृष्णा नदीच्या शुध्दीकरणासाठी केंद्र सरकारला साद घातली आहे.
कृष्णा नदीकाठाला ऐतिहासिक वारसा : कृष्णा नदी ही सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये उगम पावते. कृष्णा नदीकाठावरील वाई शहराला ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व आहे. या शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कृष्णा नदीचे शुद्धीकरण आणि सौंदर्यीकरण गरजेचं आहे. वाई शहरात मराठी विश्वकोश मंडळ आहे. या शहराला शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. महागणपती मंदिरासह अनेक मंदिरे तसेच ऐतिहासिक घाट, हे कृष्णा नदीकाठचं वैभव असल्याचंही खासदार उदयनराजेंनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय.
कृष्णा नदीकाठाला समृध्द वारसा : कृष्णा नदीकाठाला समृद्ध वारसा लाभला आहे. संगम माहुली, कराडमधील कृष्णा कोयनेचा प्रीतिसंगम, श्री क्षेत्र नरसिंहवाडी ही तीर्थक्षेत्रं कृष्णा नदीकाठी वसली आहेत. पुढे कृष्णा नदी बंगालच्या समुद्राला जाऊन मिळते. परंतु, नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळं नदीचं सौंदर्य आणि पावित्र्य धोक्यात आलं. नमामि गंगेच्या धर्तीवर 'जय जय कृष्णे' हा कृष्णा नदी शुध्दीकरणाचा प्रकल्प राबवण्यात यावा, अशी मागणी उदयनराजेंनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे केली आहे.
पर्यावरण मंत्र्यांचा हिरवा कंदील : कृष्णा नदीकाठच्या परिसरात येणारा महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, वाई हा परिसर देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हे खासदार उदयनराजेंनी निदर्शनास आणून दिल्यामुळं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी उदयनराजेंच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.
हेही वाचा -