बीजापूर- छत्तीसगडमधील बीजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, चकमकीत 31 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल नक्षलवाद्यांवर सातत्याने कारवाई करीत आहे. बीजापूरच्या फरसेगड पोलीस ठाण्याजवळील नॅशनल पार्क परिसरात महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर सकाळपासून ही चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन सुरक्षा कर्मचारी ठार झाले असून, इतर जखमी झालेत. यंदाच्या वर्षात राज्यात आतापर्यंत वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी 81 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय.
आतापर्यंत सुमारे 31 नक्षलवादी ठार : सकाळी 8 वाजल्यापासून डीआरजी बीजापूर, एसटीएफ, सी-60 जवान अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत सुमारे 31 नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. या चकमकीत राज्य पोलिसांच्या जिल्हा राखीव रक्षक दलातील एक आणि विशेष कार्य दलातील एक असे दोन सुरक्षा कर्मचारीही ठार झाले आणि इतर दोघे जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मृतदेह ताब्यात घेण्याबरोबरच जखमी जवानांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले.
संयुक्त सुरक्षा दलाला पाचारण : राष्ट्रीय उद्यान परिसरात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त सुरक्षा दलांना रवाना करण्यात आले. राष्ट्रीय उद्यान परिसरात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे. एएसपी चंद्रकांत गोवर्णा म्हणाले की, सकाळपासून चकमक सुरू आहे. अनेक नक्षलवादी मारले गेले असण्याची शक्यता आहे. घटनेच्या ठिकाणी नक्षलवाद्यांचे मृतदेह दिसलेत. त्यांची संख्या अद्याप स्पष्ट नाही. पथक परतल्यावर यासंदर्भात अधिक माहिती दिली जाईल. परिसरात जोरदार शोधमोहीम सुरू आहे. आतापर्यंत राज्यात ठार झालेल्या 81 नक्षलवाद्यांपैकी 65 नक्षलवादी हे बस्तर विभागात ठार झालेत, ज्यामध्ये सात जिल्हे समाविष्ट आहेत, ज्यात बीजापूरचा समावेश आहे. गेल्या वर्षी छत्तीसगडमध्ये झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी 219 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचाः
विजापूरमध्ये सुरक्षा दल अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार
आबुझमाड चकमक : आबुझमाडच्या जंगलात आणखी एका नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश