हैदराबाद: देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि वेलजन ग्रुपचे संस्थापक वेलमती चंद्रशेखर जनार्दन राव ( VC janardhan rao murder) यांची नातवानं निर्घृण हत्या केली. ही हत्या जनार्दन राव यांच्या हैदराबाद येथील राहत्या घरी करण्यात आली. कीर्ती तेजा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
कशी झाली हत्या: सरोजिनी देवी या मुलगा कीर्ती तेजासोबत वडील जनार्दन राव यांच्या घरी गुरुवारी रात्री पोहोचल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्तेच्या वाटपावरून जनार्दन राव आणि कीर्ती तेजा यांच्यात जोरदार वाद झाला. त्यावेळी सरोजिनी देवी वडिलांसाठी चहा आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या होत्या. आजोबांकडून अन्याय्य वागणूक मिळत असलेला आरोप करत कीर्ती तेजानं सोबत आणलेला चाकू काढून राव यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. वडिलांचा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकून सरोजिनी देवी धावत आल्या. सपासप ७३ वार केल्यानं जनार्दन राव यांचा जागीच मृत्यू झाला. सरोजिनी देवी मुलाजवळ पोहोचताच मुलानं त्यांच्यावरही हल्ला केला. सरोजिनी देवी यांच्यावर चार ठिकाणी चाकूनं वार करण्यात आलं. आरोपीनं हत्येचे साक्षीदार असलेल्या सुरक्षा रक्षकालाही धमकी दिली. यानंतर तो तिथून पळून गेला.
पोलिसांकडून तपास सुरू- पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी पंजगुट्टा येथे आरोपीला अटक केली आहे. सरोजिनी देवी यांच्यावर ज्युबली हिल्स येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी करण्यात येणार आहे. पोलीस सर्व बाबींचा तपास करत आहेत. या घटनेमागे आणखी काही कट रचण्यात आला आहे का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
काय आहे मालमत्तेचा वाद: पंजगुट्टा पोलिसांच्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील एलुरू भागातील जनार्दन राव हे अनेक वर्षांपासून सोमाजीगुडा येथे राहत होते. अलीकडेच त्यांनी मोठ्या मुलीचा मुलगा श्रीकृष्ण याची वेलजन कंपनीच्या संचालक पदी नियुक्ती केली. तर त्यांची दुसरी मुलगी असलेल्या सरोजिनी देवीची मुलगी कीर्ती तेजाच्या (२९) नावावर ४ कोटी रुपये जमा केले. मात्र, यावर समाधानी नसलेल्या कीर्ती तेजाचा आजोबांबरोबर वाद होता.
उद्योगविश्वात दु:ख- आरोपी कीर्ती तेजा अलीकडेच पदव्युत्तर पदवी पूर्ण करून अमेरिकेतून परतला होता. त्याला ड्रग्जचं व्यसन असल्याचा पोलिसांना संशय आहे. जनार्दन राव हे परोपकारी कार्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी एलुरू येथील सरकारी जनरल रुग्णालय आणि तिरुमला तिरुपती देवस्थानमला (टीटीडी) मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या होत्या. त्यांच्या हत्येनंतर उद्योगविश्वात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.