पुणे : राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं सोमवारी दुपारच्या सुमारास अपहरण झालं असल्याची तक्रार पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. याची तत्काळ दखल घेत पोलिसांनी तानाजी सावंत यांच्या मुलाला परत पुण्यात आणलं. याबाबतची तक्रार तानाजी सावंत यांनी सिंहगड पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली.
प्रायव्हेट चार्टर्ड घेऊन बँकॉकला जात होते : "सोमवारी चार वाजल्याच्या सुमारास पोलीस कंट्रोल रुमला माहिती मिळाली की, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण केलंय. ही माहिती मिळताच सर्व टीम कामाला लागल्या होत्या. तत्काळ तपासाला सुरुवात झाली आणि अखेर ऋषिराज सावंत यांना पुण्यात आणलं. मिळालेल्या माहितीनुसार, प्रायव्हेट चार्टर्ड घेऊन ऋषिराज आणि त्याचे मित्र बँकॉकला जात होते. ट्रॅकिंग करून पोलिसांनी हे चार्टर्ड पुण्यात परत आणलं आहे. हे तिन्ही सुखरूप असून, कोणत्या कारणासाठी हे तिकडे जात होते याबाबत विचारपूस करण्यात येत आहे," अशी माहिती पुण्याचे पोलीस उपायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली.
मुलाची चौकशी करणार : "बेपत्ता तसंच अपहरण असं काहीच नाही. न सांगता जाण्याची कुठलीही पद्धत आमच्या घरात नाही. कुठे जरी जायचं असेल तर मला नेहमी फोन करून तो सांगत असतो. त्यानं त्याची गाडी न वापरता दुसऱ्याचीच गाडी वापरली आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून पोलिसात तक्रार दिली होती. आमच्यात कुठलाही कौटुंबिक वाद नसून, तो का गेला आणि न सांगता का गेला म्हणून पोलिसांकडं धाव घेतली," अशी प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली.
खबरदारी म्हणून तक्रार दिली : "मी जेव्हा आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आलो तेव्हा मला त्याच्यासोबत असलेल्या ड्रायव्हरनं माहिती दिली की ऋषिराज हा त्याच्या दोन मित्रांबरोबर गेलाय. तसंच मित्राच्या गाडीत गेल्यानं मी खबरदारी म्हणून तक्रार दिली," असं तानाजी सावंत यांनी सांगितलं.
हेही वाचा -