मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला (Santosh Deshmukh Murder Case) आज दोन महिने पूर्ण झालेत. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई झालेली नाही. याशिवाय आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे नक्की कोण आहे हेदेखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज (9 फेब्रुवारी) पुन्हा एकदा 'एक्स'वर पोस्ट करत प्रश्न उपस्थित केलेत. तर दुसरीकडं भाजपा आमदार सुरेश धस यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय.
एक्सवरील पोस्टमध्ये काय म्हणाल्यात अंजली दमानिया? : "आज तरी राजीनामा घेणार का? आज संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक तपशीलवार पत्र, ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप मी पुराव्यासकट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकायुक्त, उपमुख्यमंत्री अजित पवार, इलेक्शन कमिशन, CBI, CAG आणि ACB ला पाठवत आहे. वाल्मिक कराडला यांचा पाठिंबा नसता तर ही क्रूर हत्या झाली नसती. आज तरी ते चौकशी लावतील आणि राजीनामा घेतील अशी अपेक्षा आहे. अजून बरंच काही कळणं बाकी आहे. अजून त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फोनचा डेटादेखील रिट्रीव झालेला नाही. अजून का झाला नाही? तो बडा नेता कोण आहे, अजून का कळले नाही? जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत दबाव राहणार. त्यामुळं त्यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे", असं दमानिया आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
...तोपर्यंत माघार नाही : बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनीदेखील मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत माघार नाही, अशी मागणी आता लावून धरलीय. "गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न मार्गी लागत नाही. मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. कारण जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी", अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केलीय.
काय म्हणाले सुरेश धस? : याप्रकरणी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपा आमदार सुरेश धस म्हणाले की, "संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोर्चे काढण्यात आलेत. मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही. मात्र, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. या प्रकरणातील इतर आरोपी अटकेत आहेत. मात्र, कृष्णा आंधळे अजूनही सापडत नाही. त्यामुळं मोठा प्रश्न निर्माण झालाय. हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालावं. तसंच सगळे आरोपी फासावर जावेत, अशी प्रार्थना मी देवाच्या चरणी केली आहे."
हेही वाचा -