पालघर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात एमडी ड्रग्ज प्रकरण चांगलंच गाजत आहे. असं असतानाच पुणे (Pune), नाशिकनंतर (Nashik) आता पालघरमध्ये (Badlapur) पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. पालघरमध्ये रसायनशास्त्राच्या द्विपदवीधरानं आपल्या शिक्षणाचा वापर चक्क एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी केल्याचं निष्पन्न झालंय. दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आली असून 2 कोटी 42 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
घरात तयार करायचा ड्रग्स : बोईसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात 2 कोटी 42 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. आमान नई मुराद (वय 29, रा. वसई, जिल्हा पालघर) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो आपल्या घरातच ड्रग्स तयार करायचा. त्याच्या घरातून मेफेड्रोन नावाची पिवळसर रंगाची पावडर आणि अन्य साहित्य असा एकून 2 कोटी 42 लाख 7 हजार 202 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. तर पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हटकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
भिंवडीचे गुजरात कनेक्शन? : गेल्या सहा महिन्यापूर्वी भिंवडीतून 800 कोटी रुपयांचे द्रवरूप एमडी ड्रग्ज गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकानं जप्त केले होते. भिवंडी-वाडा मार्गावर एमडी ड्रग्ज उत्पादन युनिटवर छापा टाकून हे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्याचवेळी गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील एका फार्मा कंपनीवरही ‘एटीएस’नं धाड टाकून 31 कोटी रुपयांचे द्रवरूप रामाडोल जप्त केले होते. त्यानंतर आता ठाणे, पालघर आणि गुजरातचे देखील ड्रग्स कनेक्शन आढळून आले आहेत. ड्रग्स निर्मितीची ठिकाणं उद्ध्वस्त केली जात असली तरी महाराष्ट्रातील तस्करी आणि विक्री मात्र थांबायला तयार नाही.
दोन दिवसांपूर्वीच सांगलीमध्ये 30 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. तर यापूर्वी सांगली जिल्ह्यात दोनशे कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पालघर पोलीस सतर्क झाले आहेत. वसई आणि नालासोपारा शहरात अनेक निग्रो वंशाच्या लोकांकडून पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केले असतानाच आता हे लोण पालघर आणि बोईसर भागातही पसरत चाललंय.
हेही वाचा -