मुंबई-विधानसभा निवडणुकीत महायुतीसह महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटप जाहीर झालेले नाही. महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सोडविण्याकरिता महत्वाची शेवटची बैठक मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुरुवारी झाली. "महाविकास आघाडीच्या सर्व जागांवरील तिढा सुटला आहे. 20 ते 25 जागांवरील निर्णय दोन दिवसात पूर्ण होणार आहे," अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 29 ऑक्टोबर आहे. त्यामुळे उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जागावाटपाचा तिढा सुटलेला नसल्यानं आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गुरुवारी मुंबईतील बीकेसीमधील सोफीटेल मॅरेथॉन बैठक झाली. सकाळी 11 वाजल्यापासून बैठक सुरू होती. या बैठकीला शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे, काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि इतर नेते उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक (Source- ETV Bharat reporter)
तिन्ही पक्षाचे हायकमांड निर्णय घेतील-महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "महाविकास आघाडीची यादी तयार आहे. तिढा असलेल्या 20 ते 25 जागांची माहिती शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठवून त्यावर निर्णय होईल. उद्या किंवा परवा फायनल यादी जाहीर केली जाईल. जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, अशी प्रत्येक पक्षाची मागणी आहे."
शुक्रवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख म्हणाले की, " राज्यात निवडणुक आचारसंहिता लागली असून काही तक्रारी आमच्याकडं आल्या आहेत. त्या अनुषंगानं महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ उद्या मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटणार असून मतदान यादीतील संदिग्धता, मतदान व्यवस्थित होणे, मतदाराना देणाऱ्या सोयी-सुविधा याविषयी चर्चा करणार आहोत. महाविकास आघाडीची संयुक्तक पत्रकार परिषद शुक्रवारी शिवालय येथे होणार आहे."
कोण किती जागा लढविणार?लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महायुतीला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीनं व्युहरचना आखायला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांपासून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी बैठकींचा खल सुरू आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेली काँग्रेस सर्वाधिक 115, शिवसेना (ठाकरे पक्ष ) 90, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष ) 75 जागा लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. तर मित्रपक्ष असलेल्या शेकापला 3, समाजवादी पक्ष 3 आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वाट्याला 2 जागा दिल्या जाणार असल्याचे समजते. परंतु कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत आतापर्यंत 250 वर जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांचा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर मित्रपक्षांनी किमान 12 जागांचा मिळाव्यात, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे या मित्रपक्षांना काेणत्या जागा द्यायचा? याचा तिढा सोडवूनच पुढील जागा निश्चित केल्या जाणार आहेत.
- राज्यातील विधानसभा निवडणुकीकरिता एकात टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघाचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.
हेही वाचा-
- श्रीरामपुरात काँग्रेसचे दोन गट; 'पंजा' गड राखणार की मिळणार दुसरा आमदार?
- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून हवालामार्गे पैसा ; 42 लाखांची रोकड जप्त, दोघांना ठोकल्या बेड्या
- अमरावती विधानसभा निवडणुकीत तीन दिग्गजांमध्ये होणार लढत, जाणून घ्या राजकीय समीकरणे