महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"...म्हणून राहुल गांधींनी शिर्डी मतदारसंघाचा प्रश्न संसदेत मांडला" प्रभावती घोगरे यांनी दिली माहिती - MAHARASHTRA ELECTION PROCESS

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला. त्यांच्या शिर्डीतील वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे यांनी प्रतिक्रिया दिली.

Rahul Gandhi criticized Mahayuti over Maharashtra election process, Prabhavati Ghogare explained background behind allegations, Radhakrishna Vikhe Patil
राहुल गांधी, प्रभावती घोगरे, राधाकृष्ण विखे पाटील (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2025, 7:54 AM IST

Updated : Feb 4, 2025, 11:40 AM IST

शिर्डी : खासदार राहुल गांधी यांनी शिर्डीतील एकाच इमारतीत 7 हजारांहून अधिक मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले आहेत. राहुल गांधींच्या या आरोपांमागची नेमकी पार्श्वभूमी काय? याचं उत्तर शिर्डीतील कॉंग्रेस नेत्या प्रभावती घोगरे यांनी दिलं आहे.

काय म्हणाल्या प्रभावती घोगरे? : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसच्या प्रभावती घोगरे आमने-सामने होते. त्यांच्या दाव्यानुसार, मतदानाचा दिवशी घोगरे आपल्या सहकाऱ्यांसह लोणी बुद्रुक येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर पोहोचल्या होत्या. त्यावेळी अनेक शालेय विद्यार्थी मतदान करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. घोगरे यांना संशय आल्यानं त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यातील अनेक विद्यार्थी इतर जिल्ह्यासह काही राज्याबाहेरील असल्याचं आढळलं. तसंच हे सर्व विद्यार्थी विखे पाटलांच्या 'प्रवरा मेडिकल ट्रस्ट' आणि 'प्रवरा इंजिनिअरिंग ट्रस्ट'मध्ये शिक्षण घेत असल्याचं स्पष्ट झाल्याचा त्यांनी दावा केला. विद्यार्थ्यांकडून बोगस मतदान करून घेतलं जात असल्याचा आरोपदेखील काँग्रेस नेत्या घोगरे यांनी केला. तसंच घोगरे यांनी या प्रकरणाची तातडीनं निवडणूक अधिकाऱ्यांकडं तक्रार केल्याचं माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.

पुढं त्यांनी सांगितलं की, "निवडणुकीचा निकाल लागूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही. लोणी बु. आणि लोणी खु. येथील 23 मतदान केंद्रावरील मतदानाची आकडेवारी समोर आल्यानंतर 7 हजारांहून अधिक बोगस मतदान या केंद्रांवर झाल्याचं आमच्या लक्षात आलं. शिर्डी विधानसभा मतदारसंघात कशा पद्धतीनं भाजपाच्या नेत्यानं बोगस मतदान घडवून आणलं? हा सर्व प्रकार एक महिन्यापूर्वी दिल्ली येथील काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या नेत्यांना सांगितला होता. हा सर्व प्रकार कोअर कमिटीनं राहुल गांधी यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी हा विषय संसदेत मांडला."

राहुल गांधींच्या आरोपांवर काय म्हणाले विखे पाटील? :राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले,"राहुल गांधी यांनी हा शोध कुठून लावला, त्याचाच मी आता शोध घेतोय. राहुल गांधींनी कोणतंही विधान करण्यापूर्वी भान ठेवायला हवं. राज्यात भाजपाला मोठा जनादेश मिळाल्याचं काँग्रेस पक्षाला दु:ख आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतासुद्धा ठरवण्याएवढं संख्याबळ त्यांच्याकडे नाही. राहुल गांधींनी त्याची चिंता करण्याची गरज आहे."

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यावरूनही विखे पाटील यांनी नाव न घेता त्यांना टोला लगावला. ते म्हणाले, " नगर जिल्ह्यातील अनेक प्रस्थापितांना जनतेनं घरी बसवलं. त्या नेत्यांचा अजूनही त्यावर विश्वास नाही. त्यामुळं ते आपल्या अस्तित्वाची धडपड करत आहेत."

हेही वाचा -

  1. राहुल गांधींच्या विधानानं राजकारण तापलं; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, शिर्डीत नेमकं काय घडलं?
  2. विधानसभा निवडणूक 2025; दिल्लीतील 'या' मतदार संघातून जिंकलेला आमदार होते मुख्यमंत्री; मात्र तिथंच राहुल गांधींची पदयात्रा रद्द
  3. परभणीत जाऊन राहुल गांधी यांनी विद्वेषाचं काम केलंय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
Last Updated : Feb 4, 2025, 11:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details