छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - देवेंद्र फडणवीस हे विकासाचे राजकारण करण्याच्या मनस्थितीत आहेत. सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण केले गेले पाहिजे, असं त्यांचं मत आहे. म्हणून त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांचा काही प्लान असेल तर तो जाणून घेतला असावा, अस मत शिंदे गटाचे शिवसेना नेते तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय. राज ठाकरे यांच्याकडे ना आमदार आहेत, ना खासदार तरी त्यांची भेट घेणं ही वेगळी भावना दिसून आलीय. आमच्या राजकारणावर काही परिणाम होईल, असं समजण्याचं कारण नाही. राज ठाकरेंचे सर्वच राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंध असल्यामुळे ही भेट झाली असावी, असंदेखील त्यांनी सांगितले.
आमदारकीबाबत निर्णय वरिष्ठ घेतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे नेते राज ठाकरे यांच्या भेटीत अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्याबाबत चर्चा झाल्याचं बोललं जातंय. त्यावर अमित ठाकरेंना आमदारकी द्यायची की नाही त्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, हा एकट्याचा निर्णय नसून तिघांचा निर्णय असेल, अशी काही चर्चा झाल्याची माहिती मला तरी नाही. राजकारणात अशा भेटी होतात, आमचे वैयक्तिक भांडण नाही. विधानसभेच्या निवडणुकीचा आणि भेटीचा अर्थ लावण्यात काही अर्थ नाही, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय.
उदय सामंत यांच्यासह अनेक नाराज : उदय सामंत यांच्या खात्यातील अधिकारी त्यांचे ऐकत नसल्याचे ते नाराज असून, ते मुख्यमंत्र्यांना त्याबाबत पत्र लिहिणार आहेत. यावर बोलताना काही अधिकारी जसे वागतायत, त्यामुळे अनेकांची नाराजी आहे. उदय सामंत यांनी फक्त बोलून दाखवली, अनेक मंत्री बोलतील, असा अंदाज आहे. पण अधिकारी जर असे कामकाज चालू ठेवत असतील तर ते आम्ही चालू देणार नाही. माझ्या खात्यात अजून अशी तक्रार नाही, पण अनेक लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलू, असंही संजय शिरसाट यांनी सांगितले.
शिंदे यांनी समितीत जाणे टाळले असावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदे यांना न घेता अजित पवार यांना स्थान दिले. याप्रकरणी एकनाथ शिंदे यांना दुसरे काही काम असेल किंवा संघटनात्मक बांधणीमध्ये लक्ष द्यायचे असेल, त्यामुळे त्यांनी मला या समितीत राहायचे नाही, असे सांगितले असावे, वगळले वगैरे असे काही नाही. मुळात ते खातं त्यांच्याकडे होतं, त्यामुळे वगळण्याचा प्रश्न येत नाही. त्यांनी मागणी केली, त्यामुळे ते त्या समितीत नसतील, असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिले.
हेही वाचा -