सातारा : वाई तालुक्यातील पांडवगडावर मधमाशांनी पर्यटकांवर जोरदार हल्ला चढवल्यानं इंदापुरातील (जि. पुणे) सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील दोघे बेशुध्द पडले. सर्व जखमींना गडावरून खाली आणून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोपाळ अशोक दंडवते, निखिल मगनदास क्षीरसागर, गोपाळ राजाभाऊ आवटी, चैतन्य विवेक देवळे, आल्हाद विलास सदावर्ते आणि संतोष जाफेर, अशी त्यांची नावं आहेत.
वैद्यकीय पथक तातडीने पोहचलं गडावर : पांडवगडावर मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची माहिती वाई पोलीस ठाण्यातील हवालदार श्रीनिवास बिराजदार, नितीन कदम तसेच वाई तालुका वैद्यकीय अधिकारी सागर गायकवाड यांना मिळाली. त्यांनी पाच रुग्णवाहिका आणि कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या पथकाला पांडवगडावर पाठवलं. वैद्यकीय पथक तब्बल पाच कि. मी. डोंगर चढून पांडव घटनास्थळी पोहचलं.
चादरीची झोळी करून जखमींना खाली आणलं : वैद्यकीय पथकानं गडावर जखमींचा शोध घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर गडाच्या आजुबाजूच्या गावांतील तरुण आणि ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावलं. ग्रामस्थांनी चादरीची झोळी करून जखमींना गडावरून खाली आणण्यास मदत केली. वाटेतच वैद्यकीय पथकानं जखमींवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर सर्व जखमींना रुग्णवाहिकेतूक वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दोन गंभीर जखमींना साताऱ्याला हलवलं : मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सहापैकी दोघे बेशुध्द होते. वाई ग्रामीण रुग्णालयात गंभीर जखमींवर उपचाराची सोय नसल्यानं बेशुद्ध असलेल्या दोघांना सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलं. हवेत परफ्यूम फवारल्यानं खवळलेल्या मधमाशांनी हल्ला केल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा -