नागपूर - नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी आंतर-राज्य टोळीच्या एका चोरट्याला अटक केली आहे. जो चोरीच्या पैश्यातून प्रयागराज येथील गंगा नदीत स्नान करून नागपूरला परतला. मात्र, गंगेत त्या चोरट्यानं केलेलं पाप धुतलं गेलंचं नाही आणि तो थेट पोलिसांच्या लॉकअपमध्ये पोहचला. हा चोरटा साधासुधा नसून तर एकदमचं हायटेक आहे.
रजनीकांत केशव चानोरे असं या चोराचं नाव आहे. त्याचं वय अवघं २४ वर्ष आहे, मात्र त्याचे कारनामे बघून पोलीस देखील चक्रावले आहेत. त्याला मध्यप्रदेशच्या भोपाळ येथून अटक केली आहे. रजनीकांत केशव चानोरे नामक चोरट्याने फक्त नागपूरच किंवा विदर्भातील जिल्ह्यात घरफोडी केली नाही तर शेजारच्या राज्यातील शहरांमध्ये त्याने चोऱ्या केल्या आहेत. त्याच्यावर पंधराहून अधिक गुन्हे नागपुरात दाखल आहे.
चोरट्याचे महागडे शौक, पोलीस शॉक - आरोपी रजनीकांत चानोरे हा मूळचा भंडाराचा रहिवासी आहे. आरोपी घरफोडीच्या पैशातून लक्झरीलाईफ स्टाईल जगत होता. महत्त्वाचं म्हणजे घरफोड्या करून मिळालेल्या पैशातून तो महागडे मोबाईल ब्रॅण्डेड कपडे आणि कारसुद्धा मेंटेन करायचा. एवढंच नाही तर चोरट्याने नागपुरात आलिशान फ्लॅट देखील भाड्याने घेतला होता.
लग्नघर असायचे टार्गेट - आरोपी रजनीकांत चानोरे याची चोरी करण्याची पद्धत हटके होती. ज्या घरी लग्न सोहळा झाला आहे आणि घरातील सर्व मंडळी रिसेप्शनसाठी घराबाहेर असायचे त्या घरात हा चोरी करायचा. त्यासाठी तो आपली कार वापरत असे. साधारपणे दीड ते दोन किलोमीटर दूर कार पार्क करून गल्लीबोलातून लग्न घर गाठत असे. चोरी केल्यानंतर स्वतःच्या कारने आरोपी अगदी आरामात पोबारा करायचा.
चोरट्याची धर्मीक बाजू - हा चोर धार्मिकसुद्धा आहे. चोरीच्या पैशातूनचं कुंभमेळ्यात जाऊन गंगा स्थान केलेलं आहे. तो मूळचा भंडारा जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्यानं नागपुरात आपलं बस्तान मांडलं होतं. त्यासाठी त्याने एक फ्लॅट भाड्याने घेतला.