चंद्रपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले. यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. "सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळं त्या कधी होतील हे सांगता येणार नाही. अशातच ज्या राजकीय भेटीगाठी होत आहेत, त्याचा या निवडणुकांशी काहीही संबंध नाही. राजकीय आखणी ही अशा भेटीगाठी घेऊन होत नसतात," असं म्हणत मनसे आणि भाजपामध्ये काही शिजतंय का ही संभावना त्यांनी खोडून काढली.
राजकीय आखणी : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. कार्यकाळ पूर्ण होऊनही मागच्या तीन वर्षांत या निवडणुका झालेल्या नाहीत. सध्या याबाबतचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, न्यायालयाच्या निकालानंतर त्या कधी होणार याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे. अशातच राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांना अभूतपूर्व यश मिळाल्यानं आता भाजपाची याबाबतची नेमकी काय राजकीय आखणी असणार आहे याकडे लक्ष लागलं आहे. तर दारुण पराभवामुळं महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि मित्र पक्षांत धुसफूस बघायला मिळत आहे.
सुधीर मुनगंटीवारांनी चर्चा फेटाळल्या : राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाची नेमकी काय भूमिका असणार आहे तेही अजून गुलदस्त्यात आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आलीय का? अशीही कुजबुज सुरू झाली आहे. यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत या विषयाचं खंडन केलं.
उघडपणे भेटी आणि चर्चा होत नसतात : "राजकीय आखणीच्या चर्चा या अशा जाहीरपणे होत नसतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप अनिश्चित आहेत. सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतरच त्या होणार आहेत. त्या घोषित झाल्यानंतर त्याचा कार्यकाळ बघता इतक्या लवकर कोणी याबाबत राजकीय चर्चा सुरू करणार असे वाटत नाही आणि यासाठी अशा उघडपणे भेटी आणि चर्चा कधीच केल्या जात नाहीत. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील ही एक सहज भेट आहे. यात निवडणुका, युती-महायुती याबाबतची चर्चा नसून हा एक संवाद आहे. हे केवळ मैत्रीपूर्ण भेट आहे असं माझं वैयक्तिक मत आहे,' अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.
हेही वाचा -