सातारा - 'सुरूवात तुम्ही केली आहे. शेवट मी करणारच', असा मोबाईलवर स्टेटस ठेऊन विधान परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या विरोधकांना थेट इशारा दिलाय. स्टेटसमध्ये कुणाचा नामोल्लेख नसला तरी रामराजेंचा इशारा हा मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना असल्याची राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics news) चर्चा आहे.
कारवाई संपताच रामराजेंचा इशारा-रामराजे नाईक-निंबाळकरांचे चुलत बंधू संजीवराजे आणि रघुनाथराजेंच्या मुंबई, पुणे आणि फलटणमधील निवासस्थानांवर तसेच फलटणमधील संस्थांवर इन्कम टॅक्स विभागानं ५ फेब्रुवारी रोजी पहाटे धाडी टाकल्या होत्या. सलग पाच दिवस फलटणमध्ये तपासणी सुरू होती. रविवारी रात्री ही कारवाई संपली. या कारवाईबद्दल पहिल्याच दिवशी रामराजेंनी 'कृपया गर्दी करू नका, खात्याला काम करू द्या, काळजी नसावी', असा स्टेटस ठेऊन कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं होतं. कारवाई पूर्ण होईपर्यंत रामराजेंनी संयम ठेवला होता. मात्र, कारवाई संपताच रामराजेंनी स्टेटसच्या माध्यमातून विरोधकांना इशारा दिला.
माढ्यातील पराभव रणजितसिंहांच्या जिव्हारीृ माढा लोकसभा मतदार संघात रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून पराभव झाला. महायुतीत असतानाही रामराजे निंबाळकर निवडणुकीत तटस्थ होते. तर राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) असलेले संजीवराजे नाईक-निंबाळकर हे मोहिते-पाटलांच्या प्रचारात आघाडीवर होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी रामराजेंनी रणजितसिंहांच्या उमेदवारीला कडवा विरोध केला होता. त्यानंतर झालेला पराभव रणजितसिंह निबाळकरांना जिव्हारी लागला. ही पार्श्वभूमी लक्षात घेता निंबाळकर कुटुंबीयांच्या पाठीमागे प्राप्तिकर विभागाचा ससेमिरा लावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
रणजितसिंह निंबाळकरांची काय होती प्रतिक्रिया?- प्राप्तिकर विभागाच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं होतं, " संजीवराजेंची इन्कम टॅक्स विभागाकडून झालेली चौकशी ही रुटीन आहे. यंत्रणेच्या कामकाजाचा भाग आहे. नगर, इंदापूरातील दुग्ध व्यवसावरही अशी कारवाई झाली आहे. त्याच्याशी राजकारणाचा कसलाही संबंध नाही. कर चुकवला आहे का? चुकीचे व्यवहार आहेत का? याची तपासणी केली जाते," असं त्यांनी म्हटलं होतं.
संजीवराजेंचीही सूचक प्रतिक्रिया- प्राप्तिकर विभागाकडून चौकशी संपल्यानंतर संजीवराजेंनी सूचक प्रतिक्रिया दिली. "प्राप्तिकर विभागाच्या कारवाईचं मी भांडवल करत नाही. यामध्ये राजकारण आहे की नाही, हे मी सांगू शकत नाही. परंतु, सध्याचं वातावरण पाहता वेगळ सांगायची गरज नाही," असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. यावरून प्राप्तिकर विभागाच्या कारवाईमागे राजकीय षडयंत्र असल्याचंच त्यांनी अप्रत्यक्षरित्या सूचित केलं.
हेही वाचा-