मुंबई : शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी आज (10 फेब्रुवारी) पुन्हा भाजपावर निशाणा साधला. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता भाजपानं दिल्ली विधानसभा निवडणूकही जिंकली आहे. दिल्लीत देखील मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोटाळा झालाय. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झालाय. अरविंद केजरीवाल यांना त्यांच्याच मतदारसंघात अपेक्षित मतं मिळाली नाहीत. हळूहळू देशातील सर्व राज्ये भाजपा जिंकत आहे. त्यामुळं सर्व यंत्रणा भाजपाच्या हातात असल्यामुळं आम्ही लोकसभा निवडणूक कशी लढवायची?" असा सवाल संजय राऊतांनी केलाय.
आघाडीमध्ये काँग्रेस आमचा मोठा भाऊ : पुढं इंडिया आघाडीसंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, "इंडिया आघाडी केवळ निवडणुकीसाठी एकत्र दिसता कामा नये. तर इंडिया आघाडीनं सामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरायला हवं. आज इंडिया आघाडी केवळ संसदेत दिसत आहे. फक्त निवडणूक आणि जागा वाटप यांच्यात इंडिया आघाडी दिसत आहे. पण निवडणुकी व्यतिरिक्त देखील इंडिया आघाडीतील नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे." तसंच इंडिया आघाडीतील काँग्रेस हा आमचा मोठा भाऊ असल्याचंही यावेळी राऊत म्हणाले.
दंगली घडवणं भाजपाची खेळी : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. यासंदर्भात विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले, "राहुल सोलापूरकरांचं महाराजांवर बोलणं हे संघाचं आणि भाजपाचं धोरण आहे. आधी ते छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात बोलले, त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर माफी मागितली. राहुल सोलापूरकरांचे संबंध संघाशी आहेत. समाजात जातीय तेढ निर्माण होईल असं बोलायचं, दंगली घडतील अशा गोष्टींना खतपाणी घालायचं, हे भाजपाचे धोरण आहे. त्यातून त्यांना राजकीय फायदा घ्यायचाय. पण लोकांनी सावध राहिलं पाहिजे."
ठाकरे-फडणवीस भेटीवर काय म्हणाले? : पुढं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर टीका करत राऊत म्हणाले, "राज ठाकरेंनी शिवाजी पार्कला एक कॅफे उघडलेलंय, इतकंच मला माहीत आहे. तिथं लोकं सातत्यानं चहापानला जात असतात. तो कॅफे सगळ्यांसाठी खुला आहे. ही एक चांगली गोष्ट आहे की, राजकारणामध्ये असं चहापान होत असतं. तो कॅफे चांगला असेल असं मला वाटतं. लोकांनी तिकडं जावं तिथला नजारा पाहावा," असा टोला संजय राऊतांनी लगावला.
हेही वाचा -
- "शिवसेनाप्रमुख नाहीत या आनंदात भाजपाने निवडणुका लढवल्या",' संजय राऊत म्हणतात, "शिंदेंचं ऑपरेशन अमित शाह..."
- "...तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी", चंद्रकांत पाटील यांचा राऊतांना टोला
- "अमेरिकेनं भारतीय कायदा पायदळी तुडविला", स्थलांतरिताच्या हद्दपारीवरून खासदार राऊतांची केंद्रावर टीका