अकोला : विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे आज (दि.१३) अपघाती निधन झालं. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर घडली. शिवणी विमानतळावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन ते परत येत असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने राष्ट्रीय महामार्गावर जबर धडक दिली. यात माजी आमदार बिडकर यांच्यासह दोन जणांचा मृत्यू झाला.
ती भेट ठरली शेवटची : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी आमदार तुकाराम बिडकर हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी शिवणी विमानतळावर गेले होते. बावनकुळेंची भेट घेऊन परत येत असताना त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसंच त्यांचे मित्र मानकर यांचाही मृत्यू झाला.
अपघातात जागीच मृत्यू : अपघात झाल्यानंतर घटनास्थाळी असलेल्या नागरिकांनी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात भेट दिली. या घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, बिडकर यांच्या मृत्यूमुळं अकोल्यातील राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. २००४ ते २००९ पर्यंत त्यांनी मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघाचं नेतृत्व केलं आहे. त्याआधी ते विदर्भ विकास महामंडळाचे सदस्य होते. या माध्यमातून त्यांनी खारपान पट्ट्यात खूप कामं केली होती.
गुरांची वाहतूक करणारा ट्रक : ज्या ट्रकनं तुकाराम बिडकर यांच्या गाडीला धडक दिली. या ट्रकमधून गुरांची वाहतूक करण्यात येत होती, असं पोलिसांनी सांगितलं. काही महिन्यांपूर्वीच प्रा. तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. त्यात गंभीर जखमी झाल्यावर मुंबई येथे उपचार करून ते पूर्ण बरे झाले होते. आज पुन्हा दुचाकी अपघातात काळाने त्यांच्यावर घाला घातला.
हेही वाचा :