सातारा : खंडाळा तालुक्यातील शिरवळमध्ये भर चौकात एका तरुणाची जुन्या वादातून तलवारीनं सपासप वार करून हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. हत्या केल्यानंतर रक्तानं माखलेल्या हत्यारासह संशयित आरोपी थेट पोलीस ठाण्यात हजर झाला. अमर उर्फ चंदू शांताराम कोंढाळकर (रा. वडवाडी, ता. खंडाळा), असं हत्या झालेल्या तरुणाचं तर तेजस महेंद्र निगडे (रा. गुणंद, ता. भोर, जि.पुणे), असं संशयिताचं नाव आहे.
जुन्या वादातून भर चौकात हत्या : शिरवळमधील जुन्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीलगतच्या चौकात बुधवारी रात्री एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. हत्या करून रक्तानं माखलेल्या तलवारीसह संशयित आरोपी शिरवळ पोलीस ठाण्यात हजर झाला. या हत्येमुळं खंडाळ्यासह भोर तालुक्यात खळबळ उडाली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव : तरुणाच्या हत्येची माहिती मिळताच साताऱ्याच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, फलटणचे डीवायएसपी राहुल धस, शिरवळचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे यांनी घटनास्थळाची धाव घेतली. पोलीस ठाण्यात हजर झालेल्या संशयिताची रात्रीच चौकशी करण्यात आली.
संशयिताला पाच दिवस कोठडी : पूर्वीच्या भांडणातून हत्या झालेला अमर उर्फ चंदू शांताराम कोंढाळकर (वय २२) हा खंडाळा तालुक्यातील वडवाडी गावचा आहे. संशयित आरोपी तेजस महेंद्र निगडे याचं वय अवघं १९ वर्ष आहे. तो खंडाळ्यानजीकच्या भोर (जि. पुणे) तालुक्यातील गुणंद गावचा आहे. या हत्येप्रकरणी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा -