पुणे Baramati Loksabha : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेदवार उभा राहणार अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय. यासाठी त्यांनी मतदारसंघात भेटीगाठी देखील सुरू केल्या आहेत.
अजित पवारांचा बारामती लोकसभेवर दावा : यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून 'अब की बार 400 पार' असा नारा देण्यात आलाय. तशी तयारी देखील देशपातळीवर करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील शरद पवार यांचा गड मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांनी बंड पुकारला आणि भाजपा शिंदे बरोबर सरकारमध्ये म्हणजेच महायुती मध्ये सहभागी झाले. अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्यानंतर बारामतीच्या जागेवर त्यांनी दावा केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेदवार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरवातीला बारामतीच्या जागेवर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झालीय. बारामती मतदार संघात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे दौरे करत आहेत. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी देखील भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बारामतीत त्यांच्या नावाची बॅनरबाजी देखील करण्यात आली होती. यानंतर आता सुनेत्रा पवार या मतदार संघातील विविध नेत्यांनाही भेटत आहेत.
प्रचाररथही झाला तयार : सुनेत्रा पवार यांनी भाजपा आमदार राहुल कुल यांच्या कुटुंबीयांचीही नुकतीच भेट घेतली. भाजपाकडून मागील लोकसभेला बारामतीतून आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यामुळं ही भेट महत्त्वाची मानली जातेय. तर आज उपमुख्यंमत्री अजित पवार हे बारामतीत असताना सुनेत्रा पवार यांचा प्रचार रथ देखील काढण्यात आलाय. यामुळं बारामतीतून सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी झाली असून फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
हेही वाचा :
- सुनेत्रा पवार यांची भाजपा आमदार राहुल कुल यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा, बारामती लोकसभेची मोर्चेबाधणी?
- अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक, सुप्रिया सुळे यांनी केली 'ही' मागणी
- मंत्रालय परिसरात लागलं सुनेत्रा पवारांचं 'भावी खासदार' बॅनर; राजकीय चर्चांना उधाण