मुंबई : २५ जानेवारी हा मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. केंद्रीय निवडणूक आयोगाला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. मी निवडणूक आयोगाच्या जन्मदिनी शुभेच्छा देतो. पण महाराष्ट्रातील जनता शुभेच्छा देणार नाही. महाराष्ट्रात मतदान कशा प्रकारे झालं हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रियाबद्दल अनेक मुद्दे आहेत. आगामी काळात हे विषय घेतले जातील, असं म्हणत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदान याद्यातील गोंधळावर बोट ठेवलं.
१०० पराभूत उमेदवारांची याचिका : "महाविकास आघाडीमधील १०० पराभूत उमेदवारांनी निवडणुकीतील निकालाबाबत याचिका दाखल केली. भविष्यात राज्यभर निवडणूक आयोगाच्या कामाबद्दल काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. पण निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्यापद आहे," असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर केला.
मतदार याद्यांमधील गोंधळाचा फायदा महायुतीला : "निवडणूक आयोगानं ‘व्होटर डे’ ला ‘चिटर डे’ बनवलंय. मतदार याद्यामध्ये वाढीव मतदार कसे आले?" असा सवाल यावेळी चव्हाण यांनी उपस्थित केला. "७६ लाख नवीन मतदार याची नोंदणी झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत ३२ लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली होती. जवळपास ४८ लाख नवीन मतदार यांचे मतदान महायुतीला पडले. हे अतिरिक्त मतदार आले कुठून? नवीन मतदाराची नोंदणी करताना सर्वेक्षण केले नाही. मतदार याद्यामधील गोंधळामुळं याचा फायदा महायुतीला झाला. लोकसभेत चित्र वेगळं होतं. निवडणूक आयोगाच्या कामगिरीबद्दल आम्ही अजिबात समाधानी नाही," अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयात जाऊ : "आयोग हा सर्व सत्ताधारी पक्षाच्या आदेशानं चालतोय," असा गंभीर आरोप यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक आयोगावर केला. "वरील सर्वांची माहिती आणि कागदपत्र आम्ही निवडणूक आयोगाला दिले आहेत. स्वायत्त संस्था अशी ओळख असणाऱ्या निवडणूक आयोगाच्या शंकास्पद कामामुळं लोकशाही जिवंत आहे का नाही? असा सवाल निर्माण होत आहे. आयोगानं आमची दखल घेतली नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ," असा इशारा पृथ्वीराज चव्हाणांनी दिला.
याद्यातील भरमसाठ वाढ अनाकलनीय : "विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्यानं त्याचा फायदा महायुतीला झाला. लोकशाहीत निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. पण आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कामाच्या प्रक्रियेत हरताळ फासली. महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या ९.७ कोटी असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं. पण मोदी सरकारमधील आरोग्य मंत्रालयानं १८ वर्षांवरील प्रौढ मतदारसंख्या ९.५४ कोटी असल्याचं म्हटलेय. मग आकडेवारीनुसार, १६ लाख मतदारसंख्या वाढली कशी?," असा सवाल यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. "लोकसभा निवडणुकीनंतर १३२ विधानसभेत २०-२५ हजार नवीन मतदारांची नावं समाविष्ट करण्यात आली. मतदार याद्यातील भरमसाठ वाढ अनाकलनीय व संशयास्पद आहे. निवडणूक आयोगानं याबाबत सर्व डेटा सार्वजनिक करावा," अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
फोटो काढण्यासाठी दावोसला : "जी गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे आणि ज्या कंपन्यांबरोबर सरकारनं करार केले आहेत, त्यातील 80 टक्के कंपन्या ह्या मुंबई आणि महाराष्ट्रातील आहेत. मग दावोसला हे कशासाठी गेले? केवळ फोटो काढण्यासाठी गेले होते का?" असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला.
हेही वाचा -