सातारा - छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनावरील छावा चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेत घेण्यात आल्यानं चित्रपटाचं प्रदर्शन लांबलं आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपतींचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याशी संपर्क साधला. चुकीचा इतिहास लोकांसमोर जाऊ नये, म्हणून आक्षेप असलेली दृश्ये वगळून चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करा, अशी सूचना त्यांनी दिग्दर्शकांना केली आहे.
आक्षेपार्ह दृश्ये वगळण्याची सूचना : छावा चित्रपटाचा ट्रेलर लाँच झालाय. त्यात छत्रपती संभाजीराजे लेझीमच्या तालावर नृत्य करताना दिसत आहेत. शिवप्रेमींनी त्यावर आक्षेप घेतला आहे. येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास राजेशिर्के (सातारा) यांनी छावा चित्रपट साताऱ्यात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी मध्यस्थी करत दिग्दर्शकाला आक्षेपार्ह दृश्ये वगळण्याची सूचना केली आहे.
इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करण्याचा सल्ला : दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याशी संवाद साधताना खासदार उदयनराजेंनी त्यांना इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. उदयनराजेंच्या सूचनेला दिग्दर्शकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. चित्रपटातील प्रत्येक सीन हा अत्यंत अभ्यासपूर्ण चित्रित करण्यात आला आहे. तरी देखील आक्षेप असणाऱ्या दृश्यांसंदर्भात आम्ही तज्ज्ञांशी चर्चा करू. छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र नव्या पिढीसाठी प्रेरणादायी राहील, याची काळजी घेऊ, असं आश्वासन दिग्दर्शक उत्तेकर यांनी उदयनराजेंना दिलं.
विकी कौशल, रश्मिका मंदाग्नासारखी तगडी स्टारकास्ट : छावा चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका प्रसिध्द अभिनेता विकी कौशल याने तर येसूबाई यांची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिनं केली आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे.
उदयनराजेंकडून चित्रपटाचं कौतुक : छावा चित्रपट अत्यंत सुंदर झाला आहे, अशा शब्दांत खासदार उदयनराजेंनी कौतुक केलंय. मात्र, आक्षेपार्ह दृश्यांसंदर्भात आपण इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करावी. कारण, छत्रपती शिवरायांना आणि साताऱ्याच्या राजघराण्याला लोक दैवत मानतात. त्यांच्या भावना तीव्र असतात. त्यांच्या भावना जपल्या जाव्यात, यासाठी ती वादग्रस्त दृश्ये वगळावीत, अशी सूचना उदयनराजेंनी दिग्दर्शकाला केली आहे.
हेही वाचा - छावा चित्रपट प्रदर्शनाआधी वादाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता!, संभाजी राजेंनी केली दिग्दर्शकांना 'ही' विनंती