पुणे- गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्वबळाचा नारा दिलाय. मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज संजय राऊतांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे. महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय हा फक्त मुंबईपुरता आहे. स्वबळावर महापालिका निवडणुका लढवाव्यात, अशी मुंबईतील शिवसैनिकांची मागणी आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक स्वबळाची भूमिका सध्या तरी फक्त मुंबईपुरती आहे. आम्ही मुंबईत स्वबळाचा नारा दिला, याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असा होत नाही, असंही संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय.
काहीही करून सत्तेत राहणं एवढाच अजेंडा : एकनाथ शिंदे यांना महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणे अनिवार्य होतं. त्यांच्याकडे त्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता, काहीही करून सत्तेत राहणं एवढाच त्यांच्या अजेंडा आहे. आपली कातडी वाचवण्यासाठी तसेच आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून शिंदे सत्तेत गेले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय.
शिंदे गटातदेखील लवकरच उदय होईल : भारतीय जनता पक्षाला पक्ष फोडण्याची चटक लागली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात देखील लवकरच उदय होईल. भाजपाच्या तोंडाला पक्ष फोडीचं रक्त लागलंय. त्यामुळे यानंतरही देशात नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू यांचे पक्षदेखील फोडले जातील, अशी टीकादेखील संजय राऊतांनी केलीय.
मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हे कधीही एकत्र येणार नाही : तसेच मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हे कधीही एकत्र येणार नाही. आम्ही एक भूमिका घेतली आहे. जे पक्ष महाराष्ट्राची लूट करतात, अशा पक्षांसोबत आणि त्यांना मदत करणाऱ्या पक्षासोबत आम्ही कधीही जाणार नाही. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे सेना कधी एकत्र येणार नाही, असंदेखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा-