मुंबई : मुंबईत अनेक फेस्टिव्हल होतात, विंटेज कार प्रदर्शनाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या विंटेज कारचं म्युझियम व्हावे ही आमचीही इच्छा आहे. मुंबईत शक्य तितक्या लवकर विंटेंज कार साठी संग्रहालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करुन पाठपुरावा करण्याची ग्वाही अमृता फडणवीस यांनी यावेळी दिली.
कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये शनिवारी व रविवारी असे दोन दिवस विंटेज कार प्रदर्शन भरवण्यात आले त्याच्या समारोप कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित होत्या.
विंटेज कार चालवण्याच भाग्य मिळालं : विंटेज कार चालवण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली, हे मी माझे भाग्य समजते, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. जगभरात भारताची सर्व क्षेत्रात चमकदार कामगिरी होत आहे. योहान पुनावाला सारख्या व्यक्तींमुळे देशाचा गौरव वाढत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. संस्कृती आत्मसात करणे व ह्रद्यापासून संस्कृतीचे पालन करण्याची आपली परंपरा आहे. विविधतेत एकता मुंबईत देखील दिसून येते, ही विविधता आपल्याला सर्वत्र घेऊन जाईल, असे त्या म्हणाल्या. विंटेज कार क्लब ऑफ इंडियातर्फे याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यावेळी काही काळ उपस्थित होते.
दोन दिवसात एक लाख पेक्षा जास्त नागरिकांनी दिली भेट : वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री यांनी त्यांच्या भाषणात या प्रदर्शनाला एक लाख पेक्षा जास्त लोकांनी भेट दिल्याची माहिती दिली. राज्य सरकारने विंटेज कारच्या संग्रहालयासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अशा प्रकारचे विंटेज कार संग्रहालय होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे देशभरातून मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना त्याचा लाभ होईल, असे ते म्हणाले. या मागणीसाठी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकावा, अशी मागणी त्यांनी भाषणात केली.
१८० कार, ८० बाईक चा प्रदर्शनात समावेश : विंटेज कार व बाईक प्रदर्शनामध्ये १८० कार ८० बाईकचा समावेश होता. शनिवारी सकाळी वर्ल्ड ट्रेड सेंटर ते मरीन ड्राईव्ह या मार्गावर या विंटेज कारची रॅली काढण्यात आली होती. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. रविवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर देखील या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी मोठी गर्दी होती. 120 वर्षे जुनी रोल्स रॉईस सिल्व्हर घोस्ट, 100 वर्षे 1924 एमजी टीसी अशा विविध वाहनांचा यामध्ये समावेश होता.
मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण : अमृता फडणवीस, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री, उपाध्यक्ष कॅप्टन सोमेश बात्रा, विंटेज कार क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन डोसा, राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
हेही वाचा :