मुंबई : संपूर्ण देशात आज प्रजासत्ताक दिनाच्या आनंदोत्सव सुरू असताना मुंबईकरांचा आजचा दिवस धावपळ आणि प्रचंड मनस्तापात गेला. अनेकांना सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी ऑफिस व अन्य ठिकाणी जायचं होतं. पण, लोक घराबाहेर पडल्यानंतर उपनगरीय रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचं समजलं. त्यामुळे अनेकांना आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी जाण्यास उशीर झाला.
मध्य रेल्वेनं कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याकरता शनिवारी आणि रविवारी रात्री पॉवर ब्लॉक घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, या पुलाचे काम अद्याप न झाल्यानं आता ब्लॉक कालावधी आणखी दोन दिवसांसाठी वाढणार असून, मुंबईकरांची आठवड्याची सुरुवातच ब्लॉकनं सुरू होण्याची शक्यता आहे.
कामासाठी पॉवर ब्लॉक जाहीर : मस्जिद बंदर येथील १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं काम बृहन्मुंबई महानगरपालिका करत आहे. पुलाचा गर्डर बसवण्याकरिता ब्लॉक घेण्याची विनंती पालिकेनं रेल्वेला केली होती. या पुलाच्या कामासाठी रेल्वेनं २५, २६, २७ जानेवारी ते १, २, ३ फेब्रुवारी दरम्यान कर्नाक उड्डाणपुलाच्या कामासाठी मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा व हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड स्थानकादरम्यान पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे.
काम संथगतीनं : शनिवार रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी नियोजित पॉवर ब्लॉक घेण्यात आला. तो सकाळी ५ वाजून 30 मिनिटांपर्यंत चालणार होता. मात्र, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कामाच्या ठिकाणी वेळेत न पोहोचल्यानं आणि गर्डर बसवण्याच्या कामात काही तांत्रिक त्रुटी आल्यानं काम संथ गतीनं सुरू आहे. रात्री दहा वाजता जे काम सुरू होणं अपेक्षित होतं ते काम सुरू होण्यास अधिकचा वेळ लागला. या गर्डर बसवण्याच्या कामात एक व्यक्ती जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळं रेल्वेला शनिवारचा रात्रकालीन ब्लॉक अचानक वाढवण्याची वेळ आली. हा पॉवर ब्लॉक सकाळी दहा वाजेपर्यंत चालला.
गर्डर बसवण्याच काम अपूर्ण : पालिकेचं गर्डर बसवण्याचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं पालिकेच्या या कामासाठी मध्य रेल्वेला आणखी दोन दिवसरात्र कालीन ब्लॉक घ्यावा लागणार आहे. आजचा म्हणजे रविवारचा रात्रकालीन ब्लॉक हा रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार असून पहाटे ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत चालणार आहे. याचा परिणाम म्हणजे शनिवार आणि रविवारी सोसावा लागलेला मेगा ब्लॉकचा त्रास मुंबईकरांना आता सोमवार आणि मंगळवारी देखील सोसावा लागणार आहे.
रात्रकालीन पॉवर ब्लॉक आणखी दोन दिवस वाढणार : यासंदर्भात आम्ही मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की, "कर्नाक ब्रिजवर गर्डर लाँच करण्यासाठी पालिकेनं घेतलेला ब्लॉक अजून रद्द केलेला नाही. गर्डर लाँच करत असताना काही अडचणी आल्या, आणि यामध्ये एक व्यक्ती जखमी झाली आहे. उपनगरीय लोकल सेवा दादर/भायखळा मुख्य मार्गावर आणि वडाळा रोडवर हार्बर मार्गावर सुरू आहे, आणि ब्लॉक पूर्ण होईपर्यंत ती अशीच सुरू राहील. अपघातांमुळे एक कामगार जखमी झाला आहे. प्रेशर जॅक स्लीप १५ मीटर रोलिंग झाले आहे. घटनेचा तपास सुरू आहे आणि काम लवकर सुरू होईल. या पुलाचे काम आणखी बाकी असल्याने रात्रकालीन पॉवर ब्लॉक आणखी दोन दिवस वाढवावा लागणार आहे."
हेही वाचा :
- प्रजासत्ताक दिन अन् स्वातंत्र्य दिनी मेगा ब्लॉकसारखे प्रकार नको, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
- जळगाव रेल्वे अपघातानं जागवल्या मुंबई अपघाताच्या स्मृती; महिलांच्या डब्याला आग लागल्याच्या अफवेनं घेतला 49 महिलांचा बळी
- चहावाल्याने आग लागल्याची ओरड दिली अन्...निव्वळ अफवेनं ही घटना घडली, अजित पवारांची प्रतिक्रिया