नागपूर- एसटी बसच्या तिकीट दरवाढीवरून राजकारण चांगलंच तापायला सुरुवात झालीय. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीसुद्धा तिकीट दरवाढीस विरोध दर्शवलाय, तर तिकीट दरवाढ तत्काळ मागे घेऊन सर्वसामान्य आणि गोरगरिबांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. एसटी बसच्या तिकीटची भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केली नाही, असं ते म्हणत असल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दरवाढीला कशासाठी विरोध केला? मग तिकीट दरवाढीचा निर्णय कुणी घेतला, या परिवहन खात्याचा वाली कोण, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय.
तिकीट दरवाढ तात्काळ मागे घ्या : एसटीची भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे. मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजेत. जर परिवहन मंत्र्यांनी दरवाढ केलेली नसेल तर मग दरवाढ नेमकी कोणी केली या प्रश्नाचे सरकारने तात्काळ उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केलीय. मंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा दरवाढीला विरोध आहे, तर दरवाढ मागे घ्यावी, असंही ते म्हणालेत.
अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? : अधिकारी जर खाते चालवतात का, हा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत-जंमत सुरू आहे. दरवाढीचा हा निर्णय जर अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? एखादी घटना अंगलट आली की ते तर अधिकाऱ्यांनी केल्याचे सांगायचे आणि जर चांगलं काही झालं की श्रेय घ्यायचे, अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे, असा आरोपसुद्धा त्यांनी केलाय.
...तर संस्था डबघाईला येईल- सरनाईक : विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 'ईटीव्ही भारत'कडे प्रतिक्रिया दिलीय. प्राधिकरणाची बैठक होत असते. त्यामध्ये त्यांना सर्व अधिकार दिलेले असतात. परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांना अधिकार दिलेले आहेत. प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती असते. त्या समितीला दरवाढ करण्याचे अधिकार आहेत. एसटी महामंडळ चालवायचे असेल तर दरवाढ करावी लागणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही. लोकांना तुम्ही द्याल तेवढं कमीच आहे, शेवटी संस्था चालविणं आवश्यक आहे. दरमहा तीन कोटी नुकसान असेल तर संस्था डबघाईला येईल, अशी परिस्थिती असेल तर काय सुविधा देणार आहेत. 5 हजार 700 कोटींचा एसटी महामंडळावर बोझा आहे. 87 हजार कामगार आहेत. अधिकारीवर्ग वेगळा आहे. अध्यक्षांकडून माहिती घेतली असता त्यांनी दरवाढ केल्याचे सांगितले. काही कटू निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे मला जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे, असंही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेत.
हेही वाचा-