नागपूर VCA Ready for IND vs ENG 1st ODI : नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 06 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारत व इंग्लंडचे क्रिकेट संघ सज्ज झाले आहे तर क्रिकेट रसिकांच्या स्वागतासाठी नागपूर व व्हीसीए स्टेडियम देखील सज्ज झालं आहे. व्हीसीए स्टेडियममध्ये एकूण आसन क्षमता 44 हजार 900 इतकी असून सर्व तिकीट्स सोल्ड आउट झाले असून उद्याच्या मॅचसाठी आजपासूनचं क्रिकेट रसिक नागपूर शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यात केवळ विदर्भातील नव्हे तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील क्रिकेटप्रेमींचा समावेश आहे.
खेळपट्टी आणि मैदानाचा इतिहास कसा : नागपुरच्या जामठा येथील मैदान भारतीयक्रिकेट संघासाठी लकी मानलं जातं. व्हीसीए मैदानाची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त मानली जाते त्यामुळं या सामन्यात फलंदाजांचा बोलबाला राहण्याची शक्यता असून प्रेक्षकांचे चांगलेचं मनोरंजन होईल तर गोलंदाजांसठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील मैदानावर एकूण 9 आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट मॅच खेळण्यात आले आहेत. त्यापैकी भारतीय संघ जामठाच्या मैदानावर 6 वनडे क्रिकेट सामने खेळला असून, त्यापैकी एकूण 4 सामने भारतीय संघानं जिंकले आहेत. या मैदानावरील सर्वाधिक 7 बाद 354 धावांचा विक्रम भारतच्या नावावर आहे, जो यजमान संघानं 28 ऑक्टोबर 2009 रोजी कांगारुंविरुद्ध नोंदविला होता.
भारत-इंग्लंड संघादरम्यान नागपुरात पहिल्यांदा लढत : भारत आणि इंग्लंड संघादरम्यान नागपुरामध्ये प्रथमच वनडे सामना खेळवला जाणार आहे. या मैदानावर टीम इंडियाची कामगिरीही उत्तम राहिली आहे. भारतीय संघानं आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सहापैकी चार सामने जिंकले असून, केवळ दोन लढती गमावल्या आहेत.
पाच वर्षांनंतर नागपुरात वनडे मॅच : सुमारे पाच वर्षांपूर्वी (मार्च 2019 मध्ये) जामठा स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये वनडे क्रिकेट सामना खेळण्यात आला होता. त्या सामन्यात 492 धावा निघाल्या होत्या तर याच दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यात 609 धावांचा पाऊस पडला होता. तसंच विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू रवींद्र जडेजासाठी नागपुरचं जामठा स्टेडियम 'लकी' राहिलं आहे. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांमध्ये विराट कोहलीनं दोन शतकं व एका अर्धशतकासह सर्वाधिक 325 धावा काढून भारताच्या विजयात निर्णायक योगदान दिलं आहे. याशिवाय रोहितनं या मैदानावर तीन सामन्यांमध्ये शतक व एका अर्धशतकासह 204 धावा काढल्या आहेत. तर गोलंदाजीत जडेजानं चार सामन्यांमध्ये सर्वाधिक सहा बळी टिपले आहेत. तसंच जसप्रीत बुमराहनंही चार गडी बाद केले आहेत.
📍 Nagpur
— BCCI (@BCCI) February 5, 2025
Gearing up for the #INDvENG ODI series opener..
..in Ro-Ko style 😎#TeamIndia | @IDFCFIRSTBank | @ImRo45 | @imVkohli pic.twitter.com/gR2An4tTk0
वाहतूक व्यवस्थेत बदल : हा क्रिकेट सामना बघण्यासाठी देशभरातून क्रिकेटप्रेमींनी नागपूर गाठलं आहे. सामन्याच्या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष असं नियोजन केलं आहे. उद्या नागपूर-हैदराबाद या महामार्गावर जड वाहनांना बंदी करण्यात आली असून जड वाहनं समृद्धी महामार्गावरुन वळविण्यात येणार आहेत. तसंच दोन तास अगोदर स्टेडियम गाठण्याचं आवाहन वाहतुक पोलीसांकडून करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे स्टेडियम समोरील मैदानात वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असुन पार्कींग ते स्टेडियम जाण्यासाठी बसेसची सोय असेल, तर मेट्रो रात्री साडे अकरा वाजेपर्यंत सूरु राहणार असल्याची माहिती डीसीपी अर्चित चांडक यांनी दिली आहे.
हेही वाचा :