पुणे : अभिनेता राहुल सोलापूरकर (Actor Rahul Solapurkar) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विविध संघटना तसंच शिवप्रेमींकडून अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अभिनेत्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अखेर वाढता विरोध पाहून अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त करत शिवप्रेमींची माफी मागितली आहे.
काय होतं प्रकरण? : छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते. परंतु, पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यातून सुटून महाराष्ट्रात आले होते, असं वक्तव्य अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात विविध पक्ष तसंच संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
राहुल सोलापूरकर यांनी केली दिलगिरी व्यक्त : याबाबत खुद्द राहुल सोलापूरकर यांनी व्हिडिओ शेअर करत दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, "दीड ते दोन महिन्यांपूर्वी मी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये इतिहास आणि इतिहासातील रंजक गोष्टी कशा बनतात याबद्दल केलेलं वक्तव्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. तसा विचारसुद्धा माझ्या मनात कधी येणार नाही. त्या मुलाखतीमध्ये बोलताना मी 'लाच' हा शब्द वापरला. त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो", असे म्हणत राहुल सोलापूरकर यांनी हात जोडले. तसंच साम, दाम, दंड, भेद या तत्वानुसार शिवाजी महाराजांनी काम केलं. त्याविषयी बोलताना महाराजांचा अपमान करण्याचा हेतू कुठेही नव्हता, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
इतिहास बदलणारे तुम्ही आम्ही कोण? : "छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धिमत्तेच्या जोरावर आग्र्याहून बाहेर पडले. सोलापूरकरच्या म्हणण्याप्रमाणे ते जर आले असते, तर त्यांना शंभुराजेंना दुसऱ्याकडं सोडून येण्याची गरज पडली नसती. इतिहास बदलणारे तुम्ही आम्ही कोण?" असा सवालही यासंदर्भात छगन भुजबळांनी उपस्थित केला होता.
हेही वाचा -