मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले एका पार्टी पोस्टमुळे चर्चेत आली आहे. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजसोबतचा तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर, जनाई आणि सिराज एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरू झाल्या. अफवा पसरल्यानंतर, जनाई आणि मोहम्मद सिराज यांनी त्यांच्या नात्याबद्दल मौन सोडला आहे. गेल्या रविवारी 26 जानेवारी रोजी जनाई भोसलेनं अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत तिचा 23वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या पार्टीत जॅकी श्रॉफ, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर आणि इतर नामांकित व्यक्ती उपस्थित होते. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही जनाईच्या वाढदिवसाच्या पार्टीत आला होता.
जनाई आणि सिराजची इंस्टाग्राम स्टोरी : आता या पार्टीमधील जनाई आणि सिराजचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ते नात्यात असल्याचा अनेकजण दावा करू लागले होते. यानंतर याप्रकरणी स्पष्टीकरण देताना, जनाईनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सिराजबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आणि त्यावर 'माझा प्रिय भाऊ' असं कॅप्शन दिलंय. यानंतर सिराजनं देखील जनाईची ही पोस्ट त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पुन्हा पोस्ट केली आणि एक सुंदर कॅप्शन दिलं. यावर त्यानं लिहिलं, 'माझ्या बहिणीसारखी दुसरी बहीण नाही, मी तिच्याशिवाय कुठेही राहू शकत नाही. जसा चंद्र ताऱ्यांमध्ये असतो, तशी माझी बहीण हजारोंमध्ये एक आहे.' याशिवाय त्यानं त्याच्या पोस्टवर हार्ट देखील शेअर केले आहेत. आता जनाई आणि सिराजची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.
जनाई भोसलेचं वर्कफ्रंट : जनाई भोसलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या एका म्युझिक व्हिडिओवर काम करत आहे. तिनं अनेक संगीत अल्बमसाठी आपला आवाज दिला आहे. जनाई लवकरच चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावणार आहे. तिचा पहिला चित्रपट 'द प्राइड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज ' आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप सिंग हे करणार आहेत. अलीकडेच, तिनं एका नवीन म्यूझिक प्रोजक्टचा प्रोमो शेअर केला आहे.
हेही वाचा :