नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पुढाकारानं नागपूरमधील अमरावती रोड येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पस ग्राउंड इथं ‘अॅडव्हान्टेज विदर्भ: खासदार औद्योगिक महोत्सवा'चं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवात किमान 50 हजार कोटींचे सामंजस्य करार होतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी)द्वारे 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान हा औद्योगिक महोत्सव पार पडणार आहे. तर नागपूर आणि गडचिरोली विभागात मोठ्या प्रमाणात पोलाद उद्योग येत आहेत. या औद्योगिक महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत आणखी करार होण्याची शक्यता असल्याचंही नितीन गडकरींनी सांगितलं.
गडचिरोली सर्वाधिक महसूल देणारा जिल्हा : या तीन दिवसीय औद्योगिक महोत्सवासंदर्भात अधिक माहिती देत नितीन गडकरी म्हणाले की, "आपली प्राथमिकता सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीनं मागासलेला गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणं ही आहे. आगामी पाच वर्षात गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राला सर्वाधिक महसूल देणारा जिल्हा ठरेल. हे स्वप्न आता पूर्ण होण्याकडं वाटचाल सुरू आहे."
नागपूरला लॉजिस्टिक कॅपिटल बनवायचंय : पुढं ते म्हणाले, "नागपूरला लॉजिस्टिक कॅपिटल बनवायचंय. अजनी स्थानकाचा विकास रेल्वे करणार असून त्यासाठी राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण-एनएचएआयतर्फे देऊ करण्यात आलेला निधी हा आता वर्धा जिल्ह्यातील सिंधी ड्रायपोर्टसाठी वापरला जाईल," असं गडकरींनी सांगितलं. तसंच मिहानमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग येत असल्यानं मिहानचे विस्तारीकरण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडं केल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी दिली. मदर डेअरीच्या 670 कोटींच्या मोठ्या प्रकल्पावर देखील काम सुरू होत असल्याचंही ते म्हणाले.
जागतिक केंद्र स्थापित करायचंय : "मागील वर्षी मिळालेल्या भरघोस यशानंतर या वर्षीच्या अॅडव्हान्टेज विदर्भाचे मुख्य उद्दिष्ट विदर्भाला उद्योगासाठी जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी धोरणात्मक फायदे, दळण-वळण सुविधा आणि अफाट वाढीची क्षमता प्रदर्शित करणे हे आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते, गुंतवणूकदार, उद्योगपती, उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञांसह विविध क्षेत्रातील उदयोन्मुख व्यावसायिकांना आकर्षित केलं जाईल. तसंच या औद्योगिक प्रदर्शनात विविध उत्पादनं आणि बहुक्षेत्रीय उद्योगांचा समावेश असेल. ज्यामध्ये 300 हून अधिक स्टॉल असतील", असंही गडकरी यांनी सांगितलं.
हेही वाचा -