मुंबई- एकीकडे मुंबईतील नागरिक भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण आणि इतर कार्यक्रमांसाठी एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. मात्र, अशावेळी रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक जाहीर केलाय. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. किमान प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन अशा प्रसंगी तरी मेगाब्लॉक सारखे प्रकार घडू नयेत, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलीय.
अडचणीशिवाय प्रवाशांना प्रवास करता यावा : मुंबईची लाईफ लाईन समजली जाणाऱ्या मुंबई उपनगरीय लोकल सेवेवर देशाच्या प्रजासत्ताक दिनी मेगाब्लॉक घेतल्याची बाब धक्कादायक आहे. प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी असा प्रकार होणे गंभीर आहे. प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्य दिन या दिवशी किमान कोणत्याही अडचणीशिवाय प्रवाशांना प्रवास करता येणे शक्य व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करून खासदार सुळे यांनी यापुढील काळात अशा घटना कधी घडणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलीय.
मध्य रेल्वेचा सहा तासांचा मेगाब्लॉक : मुंबईतील मशीद बंदर येथील 154 वर्षे जुन्या असलेल्या कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीसाठी मध्य रेल्वेने सहा तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. हार्बर मार्गावरील सेवादेखील विस्कळीत होतेय. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगावदरम्यान अप अन् डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक होता. मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगा ब्लॉकचा कालावधी लांबल्याने त्याचा उपनगरीय रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला. रविवारी सकाळपर्यंत हे काम होणे अपेक्षित होते. मात्र, हे काम लांबल्याने मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या भायखळा स्थानकापर्यंतच चालवण्यात आल्यात. प्रजासत्ताक दिवस असल्यामुळे अनेक मुंबईकर प्रवासात होते. त्यांना या सर्व प्रकाराचा मोठा फटका बसलाय. त्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलीय आणि असे प्रकार भविष्यात किमान प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्य दिवसासारख्या अशा राष्ट्रीय सणांच्या दिवशी तरी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करून रेल्वे प्रशासनाचे कान टोचलेत.
हेही वाचा-