नागपूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी पत्रकार प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रशांत कोरटकरच्या नागपूर इथल्या घरासमोर आज सकाळी सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात दाखल झालं आहे. या पथकात दोन वरिष्ठ अधिकारी आणि ४ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांसह कोल्हापूर पोलीस या प्रकरणाचा तपास करणार आहेत.
कोल्हापूर पोलीस नागपुरात दाखल : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकरनं धमकीचा कॉल केला होता का? या संदर्भात तपास सुरू झाला आहे. त्याचं कारण म्हणजे काल प्रशांत कोरटकरनंही बेलतरोडी पोलीस ठाण्यामध्ये इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. त्यात कोरटकरनं, तो कॉल मी केला नव्हता असा दावा केला. आज रात्री उशिरा कोल्हापूर पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकरच्या घरी जाण्याची शक्यता आहे. मात्र, कालपासून कोरटकर हा नॉट रीचेबल आहे.
कोरटकरच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा : इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं मराठा समाजातील संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळं प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा आहे.
आमच्या पद्धतीनं फोडून काढू : शिवप्रेमी आणि सकल मराठा समाजाच्यावतीनं आज नागपूरमध्ये भोसला पॅलेस इथं महत्त्वाची बैठक पार पडली. यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बैठकीला शिवप्रेमी आणि सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणीही येऊन बोलून जावं. याला आळा बसवण्यासाठी कठोर कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. प्रशांत कोरटकर हा फरार झाला असून पोलिसांना तो कसा मिळत नाही. त्याला कोणाचं पाठबळ आहे. यासाठी आम्ही उद्या संध्याकाळपर्यंतचा पोलिसांना वेळ देतो. परवा सकाळी आम्ही गनिमी काव्यानं शोधून काढू आणि आमच्या पद्धतीनं फोडून काढू अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली.
हेही वाचा :