चंद्रपूर : महाशिवरात्रीनिमित्त नदीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली जिल्ह्यात घडलीय. राजुरा आणि सावली या ठिकाणी या घटना घडल्या असून यातील सावली इथं घडलेल्या घटनेत चंद्रपूर शहरातील एकाच घरच्या तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. तर, राजुरा तालुक्यात एकाच गावातील तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळं चंद्रपूर जिल्हा हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू : महाशिवरात्रीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या मार्कंडा देवस्थान इथं भाविक मोठ्या संख्येनं जातात. इथं भगवान शंकराचं मोठ मंदिर आहे. त्यामुळं दर्शनासाठी चंद्रपूर शहरातील बाबू पेठ परिसरात राहणारे मंडल परिवार आज मार्कंडा देवस्थानकडं निघाले होते. गडचिरोली मार्गे जात असताना व्याहाड बुज इथल्या वैनगंगा नदीचं पात्र पाहून त्यांनी आंघोळ करायचं ठरवलं. यावेळी प्रतिमा प्रकाश मंडल (वय 23), कविता प्रकाश मंडल (वय 21), लिपिका प्रकाश मंडल (वय 18 वर्ष) या तीन सख्ख्या बहिणी आणि त्यांचे काका, काकू आणि त्यांचा चार वर्षीय मुलगा हे सहा जण नदीच्या पात्रात आंघोळ करत होते. या दरम्यान एक बहीण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. तिला वाचवण्यासाठी दोन बहिणी सरसावल्या. मात्र, त्याही बुडायला लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी काकू देखील पुढं सरसावल्या मात्र, त्यांच्यासोबत असलेला चार वर्षीय मुलगा बुडताना पाहून काकांनी सर्वात आधी मुलाला वाचवून मोठ्या दगडावर ठेवलं. त्यानंतर आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी सरसावले. सुदैवानं त्यांना आपल्या पत्नीला वाचवण्यात यश आलं. मात्र, तीनही बहिणी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. सावली इथल्या आपदा ग्रुपचे नितीन पाल यांनी नदी पात्रात अडकलेल्या महिलेला बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यासाठी पथक बोलवलं. अद्याप तीनही बहिणींचे मृतदेह मिळाले नसून शोधकार्य सुरू आहे.
एकाचवेळी तीन युवकांचा बुडून मृत्यू : राजुरा तालुक्यात महाशिवरात्रीनिमित्त वर्धा नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या तीन युवकांचा बुडून मृत्यू झाला. तुषार शालिक आत्राम (वय 17), मंगेश बंडू चणकापुरे ( वय 20) आणि अनिकेत शंकर कोडापे (वय 18) अशी मृतकांची नावे आहेत. हे सर्व युवक चुनाळा या गावातील आहे. महाशिवरात्री निमित्त चुनाळा इथले तुषार आत्राम, मंगेश चणकापुरे, अनिकेत कोडापे हे तिन्ही युवक आंघोळ करण्यासाठी गेले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले. यावेळी त्यांनी वाचवण्यासाठी आवाज दिला. यावेळी जवळ असलेल्या रामचंद्र रागी या युवकानं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला युवकांना वाचवण्यात यश आलं नाही. घटनेची माहिती चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर यांना मिळताच त्यांनी राजुरा पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी राजुरा पोलीस दाखल झाले. सदर घटना बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यानं तेही घटनास्थळी दाखल झाले. राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी आपत्ती विभाग चंद्रपूर इथं संपर्क करून नाव मागवली. या नावेच्या माध्यमातून शोधकार्य सुरू आहे. दरम्यान तुषार शालिक आत्राम या युवकाचा मृतदेह मिळला. तर, अन्य दोघांचे मृतदेह अद्याप मिळालेले नाहीत. महाशिवरात्रीच्या दिवशी एकाच वेळी जिल्ह्यात सहा जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :