मुंबई- अभिनेता सैफवरील (Saif Ali Khan attack news) हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. सैफच्या घरातून घेण्यात आलेल्या १९ बोटांच्या ठशांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची बातमी एका मीडिया एजन्सीनं दिली. आरोपी शहजादच्या बोटांचे ठसे हे गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेल्या वस्तुंवरील ठशांशी जुळत नाहीत, असं नमूद आहे. मात्र, हा अहवाल अजून आलेलाच नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त दिक्षीतकुमार गेडाम यांनी दिली.
बनावट कागदपत्रे काढून देणारा कोण? : मुंबई पोलिसांकडून अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसखोरी करणाऱ्या आरोपी शहजादची चौकशी सुरू आहे. त्यानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता शाहरुख खानच्या 'मन्नत'मधून चोरी करण्यात अपयश आल्यानंतर तो सैफच्या घरात घुसला होता. भारतीय कागदपत्रे बनवण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्यानं चोरी केल्याचं त्यानं पोलिसांना चौकशीत सांगितलं. आरोपीला पैशाच्या मोबदल्यात आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे देण्याचं कुणी आश्वासन दिलं होतं? त्या व्यक्तीचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत.
बनावट सीम कार्ड देणारा कोण?- मुंबई पोलिसांचे पथक आज चौकशीसाठी पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहे. आरोपीनं भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्यानंतर काही दिवस कोलकातामध्ये मुक्काम केला होता. मुंबई पोलिसांनी आरोपीकडून जप्त केलेले सीम कार्ड हे खुकमोनी जहांगीर शेख या नावानं आहे. त्यामुळे आरोपीला मदत करणाऱ्या खुकमोनी जहांगीर शेख नावाच्या व्यक्तीचा मुंबई पोलिसांकडून कोलकात्यात शोध सुरू आहे.
रक्ताच्या डागांची होणार प्रयोगशाळेत चाचणी- वांद्रे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपी मोहम्मद शहजादबरोबर इतर आरोपींचाही या हल्ल्यात सहभाग असू शकतो. घटनेच्या वेळी आरोपीसोबत आणखी कोणी उपस्थित होते का, या अँगलनं पोलिसांचा तपास सुरू आहे. हल्ला झालेल्या दिवशी सैफनं घातलेले कपडे चौकशीसाठी जप्त करण्यात आले आहेत. आरोपीनं घातलेल्या कपड्यांवरही रक्ताचे डाग आढळले आहेत. सैफच्या रक्ताच्या नमुन्यासह आणि कपड्यांसह, हल्लेखोराचे कपडेदेखील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. हल्लेखोराच्या कपड्यांवर दिसणारे रक्ताचे डाग सैफ अली खानचे आहेत हे सिद्ध झाले तर पोलिसांकडे महत्त्वाचा पुरावा असणार आहे.
हेही वाचा-