मुंबई- बृहन्मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडची उत्तर वाहिनी आता मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उत्तर वाहिनीचं लोकार्पण करण्यात आलंय. उद्या म्हणजे सोमवारपासून मुंबईकरांना या मार्गावरून प्रवास करता येणार आहे. कोस्टल रोडमुळे पेट्रोल आणि वेळेच्या बचतीसोबतच प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. तर कोस्टल रोड म्हणजे मुंबईचे भूषण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण : कोस्टल रोड दक्षिण वाहिनी नरिमन पॉइंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण आज करण्यात आलंय. त्यासोबतच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन आदी भागातील प्रवाशांना कोस्टल रोड प्रकल्पावरून ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिकांचे लोकार्पणदेखील यावेळी करण्यात आलंय. उद्या म्हणजे सोमवारपासून कोस्टल रोड दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुला राहणार आहे.
पालिकेकडून 14 हजार कोटी रुपये खर्च : यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोस्टल रोडची उत्तर वाहिनी आणि इतर तीन आंतरमार्गिकेचे लोकार्पण करीत आहोत. या प्रकल्पाचे 94 टक्के काम पूर्ण झाले असून, आज उत्तर वाहिनीचे लोकार्पण झालंय. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित करीत आहोत. यामध्ये मरिन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिका, मरिन ड्राईव्हकडून बिंदूमाधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका तसेच बिंदूमाधव ठाकरे चौकातून कोस्टल रोडला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका यांचा समावेश आहे. आता केवळ एका आंतरमार्गिकेची जोडणी व्हायची आहे, तीदेखील फेब्रुवारी अखेरीस सुरू होईल, यासाठी पालिकेने 14 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
प्रकल्पाची लांबी 10.58 किलोमीटर इतकी : मुंबईच्या दोन टोकांना जोडणारा हा प्रकल्प आहे. म्हणजे, नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जातोय. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग ते वरळी-वांद्रे सी लिंकच्या वरळी टोकापर्यंतचा कोस्टल रोड प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी 10.58 किलोमीटर इतकी असून, आतापर्यंत या पहिल्या टप्प्याचे 94 टक्के काम पूर्ण झालंय. या पहिल्या टप्प्याचा पहिला मार्ग 12 मार्च 2024 रोजी सुरू करण्यात आलाय. सध्या सुरू असलेल्या कोस्टल रोड मार्गावरून दररोज 18 ते 20 गाड्या ये-जा करत असल्याची माहिती पालिकेने दिलीय.
आता उत्तर वाहिनी पूल उपलब्ध : महापालिकेच्या माहितीनुसार, उत्तर वाहिनी मार्गिका खुली केल्यानंतर मरिन ड्राईव्हकडून कोस्टल रोड मार्गे सी लिंककडे जाणारी वाहतूक उत्तर वाहिनी पुलावरून सुरू होणार आहे. यापूर्वी मरिन ड्राईव्हकडून कोस्टल रोडकडे जाणारी वाहतूक ही दक्षिण वाहिनी पुलावरून सुरू ठेवली होती. मात्र, त्यासाठी आता उत्तर वाहिनी पूल उपलब्ध झालाय. परिणामी दक्षिण वाहिनी पुलाचा वापर नियमित दिशेने म्हणजेच वांद्रेकडून मरिन ड्राईव्हकडे येण्यासाठी करता येणार आहे.
हेही वाचा :