पुणे : मणिपूरमध्ये भाजपा नेते बिरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात भाजपाचं सरकार आहे. या भाजपा सरकारला बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पाठिंबा दिला. मात्र, हा पाठिंबा आता काढून घेण्यात आलाय. जेडीयूनं सरकारचा पाठिंबा काढून घेण्याबाबत राज्यपालांना पत्र लिहिलंय. यामुळं नितीश कुमार हे भाजपाची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, यावरच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाष्य केलंय.
काय म्हणाले रामदास आठवले? : पुण्यात शुक्रवारी (24 जाने.) रामदास आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी नितीश कुमार भाजपाची साथ सोडून जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, रामदास आठवले म्हणाले की, "नितीश कुमार यांच्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहीत आहे. मी काय सांगणार. पण नितीश कुमार आम्हाला सोडून जाणार नाहीत. त्यांची आम्हाला आवश्यकता असून आम्ही त्यांना जाऊ देणारं नाही," असं यावेळी रामदास आठवले म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भातही केलं भाष्य : यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले, "कोर्टात याबाबत केस सुरू आहे. पण एप्रिलच्या शेवटच्या महिन्यात किंवा मे मध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. भाजपा आमचा नैसर्गिक मित्र असून अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे नंतर आलेत. त्यामुळं भाजपानं आम्हाला डावलू नये. भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला योग्य न्याय देईल, असा आम्हाला विश्वास आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक देखील महायुतीनं एकत्रित लढवावी. तसंच पुणे महापालिकेत आम्हाला भाजपानं 15 ते 20 जागा द्याव्या."
हेही वाचा -