मुंबई : शिवसेना- उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत देत असले, तरी ते स्वमर्जीने स्वबळाचा नारा देत आहेत की त्यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष दूर करत आहे? असा प्रश्न राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला. मुंबईतील पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. "हिंदुत्वाचा विचार बाजूला गेलाय असे चित्र निर्माण होऊ नये म्हणून स्वबळावर लढायचा विचार केलाय की काँग्रेसनं त्यांना बाजूला केलंय?" असा प्रश्न त्यांनी विचारला.
स्वबळावर लढण्यास भाग पाडले? : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं संविधानाबाबत फेक नरेटिव्ह पसरवलं होतं. त्याचा त्यांना लाभ झाला. अनेक ठिकाणी काँग्रेसची परंपरागत मतपेढी असलेली मुस्लिम व दलित मतं शिवसेना उबाठाच्या उमेदवारांना मिळाली. मात्र, आता ही मतपेढी ठाकरेंकडं वळण्याची शक्यता वाटू लागल्यानं काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना स्वबळावर लढण्यास भाग पाडले असल्याची शंका सामंत यांनी व्यक्त केली.
टीका करणारे केवळ सहा हजार मतांनी विजयी : "राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बेताल टीका करणारे केवळ सहा हजार मतांच्या निसटत्या मताधिक्याने विजयी झाले आहेत, त्यांच्या मतदारसंघात एक दौरा झाला असता तर ते ६० हजार मतांनी मागे पडले असते. ज्यांच्यावर टीका केली जात आहे, ते एकनाथ शिंदे मात्र १ लाख १० हजार मतांनी विजयी झाले आहेत," याकडे सामंत यांनी लक्ष वेधले.
मुख्यमंत्री वेळ देतात का? : "कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी केंद्रीय नेतृत्वावर टीका करतो असा आभास निर्माण करायचा. एकीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली जाते व दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला जायचं हा काय प्रकार आहे? संपर्क साधण्यासाठी फडणवीसांकडे कुठलातरी मतदारसंघाचा विषय घेऊन जातात. देवेंद्र फडणवीस त्यांना वेळ देतात का, हे देखील आम्हाला बघायला पाहिजे," असे उदय सामंत म्हणाले.
खोटे बोल पण रेटून बोल : "वाघ नखानं कोथळा काढू अशी टीका केली जाते, एका सभेत हे वक्तव्य झालं तर दुसऱ्या सभेत एकनाथ शिंदेंनी वाघ नखे आणल्याचं दाखवून दिलं. हा दोन नेतृत्वामधील फरक आहे. राज्यात 15 लाख 70 हजार कोटी गुंतवणूक सामंजस्य करार झाले. पॅव्हिलिएन उद्घाटनाला नव्हतो, अशी अफवा पसरवली. मात्र, त्यांना ब्रीफिंग करणारी व्यक्ती फार कमकुवत आहे. स्वतःला नेता म्हणवणाऱ्या नेत्याकडे चांगली माहिती असली पाहिजे. इंडिया पॅव्हिलेएनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले तेव्हा त्यांच्यासोबत मी उपस्थित होतो. मात्र, खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे व लोकांची दिशाभूल करायची यामध्ये काहीजण माहिर झाली आहेत," असे सामंत म्हणाले.
सामंत यांनी दिलं आव्हान : "राज्यातील उद्योजकांनी जागतिक व्यासपीठावर जावून सामंजस्य करार करणे, ही राज्यासाठी महत्त्वाची बाब आहे. झालेल्या सामंजस्य करारापैकी 95 टक्के अंमलबजावणी करण्याची भूमिका आहे. ज्यांना दावोसला जायला न मिळाल्याचे दु:ख झाले ते माझ्यावर व्यक्तिगत टीका करत आहेत. माझ्या मफलरवर टीका करत आहेत, मात्र वैयक्तिक टीका करण्याऐवजी धोरणांवर बोलण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर असलेल्या आकसापोटी राज्याला बदनाम करु नये," असे सामंत म्हणाले. मविआ सरकार असताना ते देखील दावोसला गेले होते. आता मात्र टीका करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. दोन वर्षांत किती एमओयु झाले व किती प्रत्यक्षात कार्यान्वित झाले याचा आढावा घेण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत जाण्याची तयारी सामंत यांनी दाखवली.
15 फेब्रुवारी अनेक प्रवेश होणार : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ फेब्रुवारीला रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. त्या दौऱ्यादरम्यान ठाकरे गटातील अनेक संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख, माजी आमदार अशा अनेकांचे प्रवेश होणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
हेही वाचा -