मुंबई - Parampara trailer launch : भारताची संस्कृती विविध परंपरांनी भरलेली आहे. त्यामुळे समाजात रीतीरिवाज, रूढी, परंपरा यांना अनन्यसाधारण महत्व आहे. बदलत्या समाजात अनेक रूढी आणि परंपरा माणसांच्या प्रगतीत खोडा टाकत असल्याचे नवीन पिढीला वाटतं. परंतु अनेकजण विरोध असूनही काही परंपरा पाळत राहतात. अशाच एका सामाजिक विषयावर बेतलेले कथानक 'परंपरा' या आगामी मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. यात समाजाने जबरदस्तीने लादलेल्या अनिष्ठ परंपरेचा एका कुटुंबावर काय आणि कसा परिणाम होतो हे यात दाखवण्यात आलंय. नुकतेच या चित्रपटाच्या ट्रेलरचं लॉन्चिंग करण्यात आलं. या चित्रपटात उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत, आशयघन कथानक बघायला मिळेल अशी ग्वाही निर्माते देताहेत.
'परंपरा' या चित्रपटाची निर्मिती हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत करण्यात आली असून फैजल पोपरे हे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शन प्रणय निशाकांत तेलंग यांनी केलं असून त्यांनी 'परंपरा' मधून आयुष्य आणि परंपरा यातील संघर्ष रुपेरी पडद्यावर नेमक्या रीतीनं मांडला आहे. प्रदर्शनाआधी या चित्रपटानं अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात बाजी मारलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक परंपरांचे जतन करणाऱ्या कुटुंबाची गोष्ट यातून समोर येईल. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाचं जगणं, सामाजिक ताण याचं दर्शनही या चित्रपटातून घडेल.