मुंबई - दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीकनं अखेर दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. प्रतीक बब्बरनं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याची प्रेयसी प्रिया बॅनर्जीशी विवाह केला आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी हा विवाह सोहळा पार पडला. या नवविवाहित जोडप्यानं आपल्या लग्नातील काही सुंदर क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर त्याचे मित्र आणि चाहते यांची अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी झुंबड उडाली आहे. काही लोक प्रतीकच्या दुसऱ्या पत्नीबद्दल जाणून घेण्यासाठी गुगलची मदत घेत आहेत. कारण, लोकांना जाणून घ्यायचे आहे की प्रिया बॅनर्जी आहे तरी कोण? चला तर मग त्याविषयी अधिक जाणून घेऊयात.
१४ फेब्रुवारी रोजी या नवविवाहित जोडप्याने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक संयुक्त पोस्ट शेअर केली आणि त्यांच्या लग्नाबद्दल चाहते आणि फॉलोअर्सना कळवले. त्याने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मी प्रत्येक जन्मात तुझ्याशीच लग्न करेन.'
पोस्टमध्ये, प्रतीक आणि प्रिया लग्नमंडपात विधी करताना दिसत आहेत. फोटो पोस्ट झाल्यानंतर, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या. त्यात बॉबी देओल, पूजा हेगडे, वरुण शर्मा, रायमा सेन सारखे अनेक बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे.
कोण आहे प्रिया बॅनर्जी? - प्रिया बॅनर्जी ही एक कॅनेडियन अभिनेत्री आहे. हिंदी व्यतिरिक्त तिनं तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. प्रियानं २०१५ मध्ये आलेल्या 'जज्बा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात ती ऐश्वर्या राय, इरफान खान आणि शबाना आझमी यांच्याबरोबर स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसली.
याशिवाय ती ओटीटीवरील मालिकांमधूनही अभिनय करताना दिसली आहे. प्रिया बॅनर्जीनं नेटफ्लिक्सवरील मालिका राणा नायडू आणि प्राइम व्हिडिओवरील मालिका अधूरा मध्ये काम केलं आहे. २०२० मध्ये मीडिया अवॉर्ड यादीत 'मोस्ट डिझायरेबल वुमन लिस्ट' मध्ये प्रिया बॅनर्जी २२ व्या क्रमांकावर होती.
प्रतीक बब्बरची पहिली पत्नी - प्रिया बॅनर्जीच्या आधी प्रतीक बब्बरचं लग्न चित्रपट निर्मात्या सान्या सागरशी झालं होतं. दोघांचंही लग्न २३ जानेवारी २०१९ रोजी झाले. पण १ वर्षानंतर, काही कारणास्तव दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रतीक आणि सान्या यांचा २०२० मध्ये घटस्फोट झाला होता.
हेही वाचा -