नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दोनशेपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून दाखविण्याचा शब्द मी खरा करून दाखवला, असं म्हणत मला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेणाऱ्यांचं काय होतं ते अवघ्या महाराष्ट्रानं बघितलय, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंबरोबर भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनाही गर्भित इशारा दिल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंचे जोरदार भाषण : नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार दौऱ्या दरम्यान जाहीर सभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. "एक बार कमिटमेंट कर दी तो मै अपने आप की भी नही सुनता" अशी फिल्मी डायलॉगबाजी केली. "गद्दार, खोके असा आरोप करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं खोक्यात बंद करून बाजूला फेकलं. एकनाथ शिंदे 80 जागा लढला आणि तब्बल 60 जागांवर विजय मिळवला. 15 लाख मते या धनुष्यबाणाला जास्त मिळाली. यातून जनतेनं खरी शिवसेना कोणती? बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार कोण? हे दाखवून दिलं त्यामुळेच त्यांचा जळफळाट होत आहे. दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते झालेल्या माझ्या सत्काराची काही लोकांना पोटदुखी सुरू झाली आहे," अशी टीकाही शिंदे यांनी ठाकरेंवर केली.
म्हणून पोटदुखी जात नाही : "लाडकी बहीण योजनेला बदनाम करणाऱ्या सावत्र भावांना विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी चांगलेच जोडे लगावले. महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून देत विरोधकांना चारी मुंड्या चीत केलं. गद्दार, खोके म्हणून हिणवणाऱ्यांना जागा दाखवून दिली. पोटदुखी दूर करण्यासाठी कंपाउंडरकडून औषधे घेतात म्हणून त्यांची पोटदुखी जात नाही," अशा शब्दांत उध्दव ठाकरे यांच्यावर शिंदे यांनी टीका केली.
मी जनतेचा विश्वास संपादन केला : "विरोधकांनी माझी लाईन पुसण्यापेक्षा स्वत:ची लाईन मोठी करावी, तसं केलं तर मी तुम्हाला सॅल्यूट करेन. परंतु, काही लोकांची अवस्था म्हणजे सुंभ जळाला तरी, पीळ जात नाही" असं म्हणत शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना चिमटा काढला. "मी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही." असं ही शिंदे यांनी म्हटलं.
हेही वाचा :