मुंबई : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीचं सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आला. भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) 9 सनदी अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारनं आता बदल्या केल्या आहेत. हर्षदीप कांबळे, राजेश देशमुख, विजय सुर्यवंशी, सचिन ओंबासे, मिलींदकुमार साळवे आदी ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या अधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या आहेत बदल्या : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तपदी कोकण विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या डॉ राजेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. तर, त्यांच्या जागेवर उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. धाराशीवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांची बदली सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली साखर आयुक्त, पुणे या पदावर करण्यात आली. आदिवासी विकास आयुक्त पदी कार्यरत असलेल्या नयना गुंडे यांची बदली महिला व बाल विकास आयुक्त, पुणे या पदावर करण्यात आली आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक विमला आर. यांची बदली नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन इथं निवासी आयुक्त व सचिव या पदावर करण्यात आली आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मिलींदकुमार साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांची बदली नाशिकमधील आदिवासी विकास आयुक्तपदी करण्यात आली आहे. गडचिरोली इथल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांची बदली लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर करण्यात आली आहे.
बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी हर्षदीप कांबळे : राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात, त्यानंतर जानेवारी महिन्यात आणि फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे यांची उद्योग विभागाच्या प्रधान सचिव पदावरुन बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली. मात्र आठवड्याभरातच त्यांची बदली सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिव पदी करण्यात आली.
हेही वाचा :