बीड : राज्याच्या कृषी मंत्रालयामध्ये 300 कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. तसंच या घोटाळ्याच्या अनुषंगाने मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
धनंजय मुंडेंवर केला आरोप : राज्यातील कृषी विभागांमध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या शेतकरी हितांच्या खरेदीमध्ये वास्तविक किंमतीपेक्षा जास्त किंमत दाखवून खरेदी करण्यात आल्याचा आरोप, धस यांनी केलाय. तसंच खरेदी या एकाच दिवसात आदेश काढून करण्यात आल्या आहेत. त्यासाठी तत्काळ अग्रीम संबंधित कंपन्यांना अदा करण्यात आल्याचं सांगून यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप धस यांनी केलाय.
त्यांनी कुटुंबीयांना मदत द्यावी : लाभार्थी शेतकऱ्यांना देत असलेली विविध लाभाच्या योजनाची रक्कम थेट खात्यात देण्यासंदर्भात निर्णय असतानाही, हा निर्णय बदलून खरेदी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यातून धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मीक कराड यांना कोट्यवधी रुपयांचा लाभ झाला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. पक्षात त्यांचं महत्त्व कमी झाल्याचं सांगून उद्धव ठाकरे 70 दिवसानंतर मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास येत आहेत. त्यांनी येताना कुटुंबीयांना मदत द्यावी असंही धस यांनी म्हटलं.
धस यांनी मुंडेंची घेतली होती भेट : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजपाचेच आमदार सुरेश धस यांनी सातत्यानं टीका केली होती. मात्र, काही दिवसापूर्वी या नेत्यांच्या वादात नवा ट्विस्ट आला होता. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात भेट घेतल्यानं राज्याच्या राजकीय वातावरणात पुन्हा चर्चा सुरू झाल्या. धस यांनी स्वत: आपण तीन दिवसांपूर्वी मुंडे यांना भेटल्याचं जाहीर केलं होतं. "धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी आपण रुग्णालयात भेटायला गेलो होतो." असं धस यांनी सांगितलं होतं.
हेही वाचा -