नवी मुंबई : सेक्सटॉर्शनला कंटाळून प्राथमिक शाळेच्या शिक्षकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबधित शिक्षक हा अलिबाग तालुक्यातील कुर्डूस या गावातील रहिवासी होता. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण : अलिबागमधील कुर्डुस इथं राहणाऱ्या वैभव पिंगळे (४५) प्राथमिक शाळेच्या शिक्षकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.14) घडली. सेक्सटॉर्शनला कंटाळून वैभव पिंगळे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
कित्येक दिवसांपासून होते तणावात : गेल्या दिवसांपासून सायबर गुन्हेगारांच्या माध्यमातून वैभव हे सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकले होते. सायबर गुन्हेगार वैभव यांच्याकडून पैसे उकळत होते. पैसे न दिल्यास वैभव यांना विविध धमक्या हे सायबर गुन्हेगार देत होते, या प्रकाराला वैभव पिंगळे प्रचंड कंटाळून मानसिक ताणाखाली होते.
या कारणामुळं होते तणावात : 14 फेब्रुवारीला शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास वैभव पिंगळे हे अलिबागहून उरण तालुक्यातील चिरनेर मार्गे त्यांच्या वाहनाने अटल सेतूवर आले. यानंतर त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. यानंतर त्यांनी आत्महत्या केली. यावेळी सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाने अटल सेतूवर एक कार थांबली असल्याचं पोलिसांना कळवलं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस पोहचण्याआधीच वैभव पिंगळे यांनी समुद्रात उडी घेऊ आत्महत्या केली होती. पिंगळे हे सेक्सटॉर्शनचे बळी ठरले आहेत याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना होती. या संदर्भात पोलीस तक्रार दाखल करावी असा सल्ला देखील त्यांच्या कुटुंबीयांनी दिला होता. मात्र समाजात बदनामी होईल म्हणून पिंगळे पोलिसात तक्रार करण्यासाठी धजावत नव्हते. अलिबाग येथील पोयनाड पोलीस ठाण्यात ते तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तक्रार दाखल न करता ते परत आले होते, अशी माहिती उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजणे यांनी दिली. तसंच आज दुपारी वैभव पिंगळे यांचा मृतदेह सापडला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडी पार्क झालेली पोलिसांनी पाहिली होती. मात्र जोपर्यंत पोलीस अटल सेतूवर पोहोचतील तोपर्यंत पिंगळे यांनी आत्महत्या केली होती, असं सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहुल यांनी सांगितलं.
हेही वाचा :