मुंबई- देशात क्रिकेट अन् सिनेमा या दोन क्षेत्राला जेवढे ग्लॅमर, पैसा अन् प्रसिद्धी आहे, तेवढे अन्य कुठल्याही क्षेत्रात पाहायला मिळत नाही. भारतात क्रिकेट या खेळाला धर्म मानला जातो. पावलापावलावर, गल्लीबोळात क्रिकेट खेळले जाते. तर बस, ट्रेन, चौकात, नाक्यावर सर्वत्र क्रिकेटवर चर्चा रंगलेली दिसते. दरम्यान, आता क्रिकेटपटूसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय. जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल आणि क्रिकेटमध्ये करिअर करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) नवीन एक उपक्रम आणला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने पदवीधर अभ्यासक्रम सुरू करणार आहे. एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईकांनी "ईटीव्ही भारत"ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिलीय.
पदवीधर अभ्यासक्रम कधी सुरू होणार? : दरम्यान, देशात अनेक मुलांचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न असते. पण ते सगळ्यांचेच स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. त्यामुळं ज्यांना क्रिकेटर्स होता आले नाही, ते क्रिकेटमध्ये तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून क्रिकेटमधील पदवी प्राप्त करू शकतात. दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून पुढील शैक्षणिक वर्षापासून या पदवीधर अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात येईल, असेही एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने उपक्रम : मुंबई क्रिकेट असोसिएशनने यापूर्वी देखील काही क्रिकेटबाबत कोर्सेस सुरू केले होते. याचाच पुढील भाग म्हणून आता मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेटमध्ये पदवीधर अभ्यासक्रम आणला जाणार आहे. हा पदवीधर अभ्यासक्रम 12 वीनंतर किंवा 15 वीनंतर करता येणार आहे. याचा सिलॅबस तसेच अभ्यासक्रमात काय काय आणता येईल, यावर तज्ज्ञ आणि जाणकार काम करताहेत. एमसीएचा क्रिकेटमधील पदवीचा हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने असणार आहे. विशेष म्हणजे एमसीएकडे 40 हजार क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. यातील 10 हजार क्रिकेटपटू सध्या सक्रिय आहेत. दरम्यान, क्रिकेटमधील पदवीच्या अभ्यासक्रमात क्रिकेटमधील विविध अंगांचा अभ्यास असणार आहे. ऑनलाईन आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही पद्धतीने हा अभ्यासक्रम करता येणार आहे.
![क्रिकेटच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-02-2025/23550930_mumbai-2.jpg)
क्रिकेटपटूंसाठी इंग्लंडचा दौरा... : दुसरीकडे मुंबईत चांगले क्रिकेटपटू घडावे यासाठी एमसीए नेहमी पुढाकार घेत असते. दरम्यान, लवकरच मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मुंबईतील विविध क्लबमधील क्रिकेटपटूंसाठी इंग्लंडच्या दौऱ्याचे आयोजन करणार आहे. यावरदेखील एमसीएच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 'एमसीए'च्या टी-20 लीग स्पर्धा 27 मेपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतून नवोदित क्रिकेटपटूंना आपल्या खेळातून चमकदार कामगिरी दाखवण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचाः
कॉम्प्युटर इंजिनियर युवकाने नोकरी सोडत केली 'रेशीम शेती'; आता वर्षाला लाखोंची कमाई
मोडी लिपीत दडलाय देदीप्यमान इतिहास; सर्वात पहिला ग्रंथ कोणी लिहिला?