नागपूर : काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी इथल्या एका स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढं आली. अद्याप पोलीस विभागाकडून मृतकांची नेमकी संख्या किती याबाबत दुजोरा देण्यात आलेला नाही. स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाल्यानं नागरिक चांगलेच हादरले आहेत. भुरा लक्ष्मण रजक (25) आणि मुनीम मडावी (28) अशी मृतकांची नावं आहेत.
जवळच्या जंगलात लागली आग : हा स्फोट इतका शक्तिशाली होता की सुमारे 20 किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटाचे हादरे बसले आहेत. या स्फोटामुळे जवळच्या जंगलातसुद्धा आग लागल्याची ही माहिती समोर आलीय. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून घटनास्थळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह काटोल, कळमेश्वर पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मृतकांना आर्थिक मदत द्या : कंपनीतर्फे आणि राज्य शासनातर्फे मृतकांच्या परिवाराकडून मदतीची मागणी करण्यात आली आहे. हा ब्लास्ट कशामुळे झालाय, सुरक्षा नियमावलीचे पालन झालं की नाही याची याची चौकशी करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
पालकमंत्र्यांनी दिले चौकशीची आदेश : "कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स या बारूद कंपनीमध्ये स्फोट झाल्याची गंभीर घटना घडली. या दुर्दैवी घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनातील सर्व सबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी असून बचाव आणि मदत कार्याबाबत मी प्रशासनाच्या सतत संपर्कात राहून माहिती घेत आहे. अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून त्यांना प्रशासनातर्फे सर्वोतोपरी मदत केली जात आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या कामगार बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना," अशा भावना पालकमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा :