नवी मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईत 'आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग'चं आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 22 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार असून, स्पर्धेतील सामने नवी मुंबई, वडोदरा आणि रायपूर इथं खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील पहिला सामना 22 फेब्रुवारीला नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे.
'हे' दिग्गज करणार संघाचं नेतृत्व : 'आयएमपीएल' स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.30 वाजता नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे. या लीगमध्ये 6 देशांचे संघ सहभाग घेत आहेत. त्या संघाचं नेतृत्व दिग्गज क्रिकेटपटू करणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व शेन वॉटसन, इंग्लंडचं नेतृत्व इयॉन मॉर्गन, वेस्ट इंडिजचं नेतृत्व ब्रायन लारा, श्रीलंकेचं नेतृत्व कुमार संघकारा, दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व जॉंटी ऱ्होड्स आणि भारताचं नेतृत्व सचिन तेंडुलकर करणार आहेत.
सेवानिवृत्त वरिष्ठ खेळाडूंचा जलवा पुन्हा पाहायला मिळणार : बहुप्रतीक्षित 'आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग' (आयएमपीएल) स्पर्धेच्या ट्रॉफीचं आज अनावरण करण्यात आलं. या प्रसंगी क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू उपस्थित होते. हे खेळाडू आपल्या संघांचं नेतृत्व करणार आहेत. भारताचे क्रिकेट आयकॉन आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर, श्रीलंकेचे कुमार संगकारा, वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा, इंग्लंडचे विश्वविजेते कर्णधार इयॉन मॉर्गन, ऑस्ट्रेलियाचे शेन वॉटसन आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधी म्हणून आलेले जॉंटी ऱ्होड्स (जॅक्स कॅलिसच्या वतीने) या सोहळ्याला उपस्थित होते. हा शानदार कार्यक्रम नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानावर बुधवारी (दि.१९) पार पडला. आयएमपीएल स्पर्धेच्या माध्यमातून सेवानिवृत्त दिग्गज खेळाडूंचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळणार आहे. एकाच मंचावर हे खेळाडू पुन्हा एकदा पाहायला मिळणार असल्यानं क्रिकेटप्रेमींना एक पर्वणीच लाभणार आहे. अनेक वर्षांनी क्रिकेटचा देव म्हणून प्रसिद्ध असलेले सचिन तेंडुलकर आणि त्यांच्यासह इतर दिग्गज खेळाडू आपला जलवा दाखवणार आहेत.
जुन्या सहकाऱ्यांसोबत खेळण्याची संधी मिळणे हा एक अविस्मरणीय क्षण : "क्रिकेटच्या मैदानावर परत येणं म्हणजे खेळाडू म्हणून माझ्यासाठी ओळखीच्या जागी परत जाणं आहे. जुन्या सहकाऱ्यांसोबत खेळण्याची संधी मिळणं हा एक अविस्मरणीय क्षण आहे. मी आजही तेवढाच उत्सुक आहे. जितका माझ्या पदार्पणाच्या दिवशी होतो". अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकर यांनी दिली. "भारतात परत येण्यास मी खरोखर उत्सुक आहे, हा देश मला नेहमीच दुसरे घर वाटते. इथं खेळणे एक अविस्मरणीय अनुभव आहे. 'आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग'मध्ये जुन्या मित्रांसह पुन्हा एकदा मैदानावर उतरणे ही अशी गोष्ट आहे, ज्याची मी मनापासून वाट पाहत आहे." असं ब्रायन लारा यांनी म्हटले. "भारत नेहमीच माझ्या आवडत्या देशांपैकी एक राहिला आहे. मला इथं मिळालेलं प्रेम आणि पाठिंबा अतुलनीय आहे. अशी भावना ऑस्ट्रेलिया मास्टर्सचे कर्णधार शेन वॉटसन व्यक्त केली.
हेही वाचा :