ठाणे : धावत्या फास्ट लोकलमध्ये प्रवाशांचा धक्का लागल्याच्या वादातून हल्लेखोर प्रवाशानं धारदार चाकूनं तीन प्रवाशांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कोपर ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडली. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात हल्लेखोर प्रवाश्यावर भारतीय न्याय संहिता कलम 118 (2) नुसार गुन्हा दाखल करत लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शेख जिया हुसेन (वय 19, रा. मुंब्रा) असं अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरचं नाव आहे. तर अक्षय भाऊसाहेब वाघ, हेमंत कन्हैया कांकरिया, राजेश अशोक चांगलानी अशी जखमी प्रवाशांची नावं आहेत.
लोकलमधून उतरताना लागला धक्का : रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारीला कल्याण रेल्वे स्थानकातून सकाळी 9 वाजून 47 मिनिटानं सुटणारी कल्याण ते दादर फास्ट लोकलनं अक्षय भाऊसाहेब वाघ, हेमंत कन्हैया कांकरिया, राजेश अशोक चांगलानी यांनी फास्ट लोकल पकडली. त्याच फास्ट लोकलमध्ये हल्लेखोर आरोपी शेख जिया हुसेन हा देखील मुंब्रा इथं उतरण्यासाठी चढलेला होता. त्याचवेळी लोकलमधील प्रवाशांनी सदरची फास्ट ट्रेन असून मुंब्रा स्थानकात थांबत नाही, असं आरोपीला सांगितलं. त्यामुळे त्यानं लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीचा सहप्रवासी यांना धक्का लागल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला. वादातून इतर प्रवाशांनी त्याला लोकलमध्ये मारहाण केल्याचा त्यानं आरोप केला. यावेळी आरोपीनं खिशातील धारदार चाकू काढून तीन प्रवाशांना गंभीर जखमी केलं.
प्रवाशांनी आरोपीला मारहाणकरून पोलिसांच्या दिलं ताब्यात : दरम्यान घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. तेव्हा त्या तीन जखमी प्रवाशांनी आरोपीला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर आरपीएफ अंमलदार यांनी ठाणे रेल्वे स्टेशन इथं जमा केलं. त्या ठिकाणी त्यांच्यावर औषध उपचार करून तक्रार देण्यासाठी सदरची घटना डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं तक्रारदार यांनी बी एन एस 118 (2) नुसार गुन्हा दाखल आरोपीला अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिली आहे.
हेही वाचा :