पुणे : बाराशे साहित्यिक आणि साहित्यप्रेमी एकत्र येऊन संमेलनानिमित्त प्रवास करणे हा जागतिक विक्रम आहे. चार साहित्यिक एकत्र आल्यावर चांगले विचार ऐकायला मिळतात. तसंच अनेक वाद देखील होऊ शकतात, पण सकारात्मक विचार करता वाद हे जीवंतपणाचेच लक्षण आहे, हे जाणवते. साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीची जपणूक या संमेलनानिमित्ताने होत आहे, असं प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलं.
98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त मराठी साहित्ययात्री संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर हे प्रवासी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचं उद्घाटन आज मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिका डॉ. संगीता बर्वे हे सर्वजण उपस्थित होते.
पंढरपूरच्या ग्रंथ दिंडीचं स्वागत : यावेळी सुरुवातीस शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणानं रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता. प्रत्येकात चैतन्याची भावना निर्माण झाली होती. पंढरपूर येथून आलेल्या ग्रंथ दिंडीचं यावेळी स्वागत करण्यात आलं. ही दिंडी रेल्वेद्वारे दिल्लीकडं निघाली आहे. या मराठी साहित्ययात्री संमेलनादरम्यान उदय सामंत यांनी रेल्वेतून प्रवास करत साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि पत्रकारांशी संवाद साधला.
साहित्यिकांच्या मागे उभं राहणं म्हणजे... : यावेळी उदय सामंत पुढे म्हणाले, "साहित्यिकांच्या मागे उभं राहणं म्हणजे मराठी माणसाच्या मागं उभं राहणं आहे आणि मराठी माणसामागे उभं राहणं म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच्या पाठीशी असणं होय. विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचं नाव दिलं हे अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रातील नागरिक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा आदर करणारे आहेत. या महान व्यक्तीविषयी वाईट उद्गार काढणं हा देशद्रोह आहे आणि या विरोधात अख्खा महाराष्ट्र-मराठी माणूस पेटून उठेल. या संमेलनाच्या निमित्तानं मराठी भाषेला सातासमुद्रापलिकडं नेण्याचं मोठं कार्य घडत आहे".
पुस्तकाचे प्रकाशन : ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कवी केदारनाथ सिंह यांच्या ‘केदारनाथ सिंह की पचास कविताएं’ या कविता संग्रहाचा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांनी मराठीत केलेला ‘सर्जनात्मक हस्तक्षेप’ या अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुणे रेल्वे स्थानकावर झाला. या पुस्तकाचं प्रकाशन मंत्री उदय सामंत आणि डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झालं. या विषयी बोलताना सामंत म्हणाले, "संगीता बर्वे यांनी खऱ्या अर्थानं मराठीपण जपत पुस्तकाचं प्रकाशन या साहित्ययात्री संमेलनाच्या निमित्तानं केलं, ही मराठी भाषेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे".
साहित्ययात्री संमेलनाची ग्लोबल बुक ऑफ द एक्सलन्स, इंग्लडमध्ये नोंद : पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेत होणाऱ्या मराठी साहित्ययात्री संमेलनाची 'ग्लोबल बुक ऑफ द एक्सलन्स, इंग्लडमध्ये' नोंद करण्यात आली. ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लडचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी आज रेल्वे स्थानकावर झालेल्या मराठी साहित्ययात्री संमेलनाच्या उद्घाटन समारंभात राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि संयोजकांना याविषयीचं प्रमाणपत्र प्रदान केलं.
हेही वाचा -