पालघर : खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत निवडून आल्यापासून सातत्याने पाठपुरावा सुरू केलाय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची वारंवार भेट घेऊन ते अनेक प्रश्न मांडत आहेत आणि ते सोडवण्यासाठी काय करावं लागेल याच्या सूचनाही देत आहेत. आज रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी वसई-विरारमधील दोन रेल्वे उड्डाणपुलांचे प्रश्न त्याच्यासमोर मांडले आणि ते सोडवणं किती आवश्यक आहे हेही त्यांना पटवून दिलं. वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान अलकापुरी येथे उड्डाणपूल तसंच विरार आणि नालासोपारा तालुक्याच्या दरम्यान ओस्तवाल नगरी येथे उड्डाणपूल अशा दोन उड्डाणपुलांचा प्रश्न सवरा यांनी हेमंत सवरा यांच्यासमोर मांडला.
तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण परंतु..: या दोन रेल्वे उड्डाणपुलांची ‘जिओ टेक्निकल’ तपासणी पूर्ण झाली आहे. रेल्वे मार्गदर्शक तत्त्वानुसार सामान्य व्यवस्था रेखाटन तयार करण्यात आलं आहे. असं असूनही या उड्डाणपुलांच्या मंजुरीचा आणि निधीचा प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. हा प्रस्ताव तातडीनं मंजूर करावा, असं साकडं खासदार सवरा यांनी रेल्वेमंत्र्यांना घातलं. यावेळी नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांचं या प्रश्नाबाबतचं निवेदनही रेल्वेमंत्र्यांना देण्यात आलं.
उड्डाणपूल झाल्यास मोकळा श्वास : हे दोन उड्डाणपूल झाल्यास स्थानिक प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. त्याचबरोबर अपघाताचं प्रमाण कमी होईल, असा विश्वास व्यक्त करताना पालघर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हे दोन उड्डाणपूल अतिशय महत्त्वाचे असल्याचं सावरा यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितलं.
"पालघर जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत सातत्याने रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्या भेटी घेत असतो. त्यांच्याकडं प्रश्नांचा पाठपुरावा सुरू आहे. रेल्वेमंत्र्यांनी हे प्रश्न ऐकून घेऊन त्यातून मार्ग काढण्यात येईल, असा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे". - डॉ. हेमंत सवरा, खासदार
पालघरला एक्सप्रेस गाड्यांचा थांबा : पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून आता वाढवण बंदर होत आहे. या ठिकाणी द्रुतगती मार्ग, रेल्वे कॉरिडॉर, विमानतळ, बुलेट ट्रेन असे अन्य अनेक दळणवळणाचे पर्याय उपलब्ध होत आहेत. त्यामुळं पालघरची लोकसंख्या वाढत आहे. पालघर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, हे लक्षात घेऊन येथे सर्व लांबपल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी डॉ. सवरा यांनी केली. डहाणू-पालघर रेल्वे कॉरिडॉर आदिवासी तालुक्यातून नेण्यात यावा, अशी मागणी करून या विषयावर रेल्वेमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली.
हेही वाचा -
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वेला काय मिळालं? मुंबईतील लोकलला काय झाला फायदा? जाणून घ्या सविस्तर
- शिर्डीला मिळणार दुसरी 'वंदे भारत', रेल्वे मंत्र्यांचं साई दरबारी आश्वासन - Ashwini Vaishnav Saibaba Darshan
- 'डिस्को डान्सर'च्या अभिनयसामर्थ्याला सर्वोच्च पुरस्काराची दाद, मिथुन चक्रवर्ती यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर - Dadasaheb Phalke Award